मुंबई : वेदांत आणि फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस आणि सॅफ्रन हे चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असताना सोशल मीडियावर ‘गायछाप’ ब्रँड चर्चेत आला आहे. सोशल मिडियावर गायछाप ट्रेंडिंग मध्ये आहे. गायछापचं नाव घेत नेटकऱ्यांनी सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“गायछाप उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याशिवाय महाराष्ट्राला जाग येणार नाही वाटतं…” अशी पोस्ट गायछापच्या पुडीच्या फोटोसह सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
गावातल्या पारावर, एसटी स्टॅंडवर, चहाच्या दुकानावर ते अगदी मुंबई शहरातील विविध नाक्यांवर कुणाच्या हातात गायछापची पुडी दिसली की अनोळखी पण एकमेकांच्या ओळखीचे होतात. गायछापमुळे अनेकांची मैत्री झाली आहे. ऐवढ्या वर्षात आजही गायछापची ट्रेंड कायम आहे.
गाय छाप जर्दा हा तंबाखूचा एक प्रकार आहे. संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाने गायछाप ब्रँड बाजारात आणला. मालपाणी उद्योग समूहाचे गायछाप हे प्रमुख उत्पादन आहे.
9 जुलै 1994 साली पहिल्यांदा गायछाप जर्दा बाजारात आला. मालपाणी उदयोगाचा हा गायछाप ब्रँड बघता बघता इतका लोकप्रिय झाला की फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या ब्रँडची क्रेज पसरली.
सुरुवातीला गायछापची पुडी 3 रुपयाला होती. वाढत्या महागाईबरोबर गायछाप पुडीची किंमतही वाढत गेली. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये तर गायछाप पुडी मिळवण्यासाठी लोक कुणी सांगेत तिकडे फिरत होते. वाटेल ती किंमत देत होते. यामुळेच लॉकडाऊनमध्ये देखील गायछापचा उद्योग काही बुडाला नाही.
टीप – तंबाखू तसेच, तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक आहे. यामुळे अशा पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे असे आवाहन tv9 मराठी करत आहे.