मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेला बुधवार 30 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. आशिया खंडातील टीम इंडिया, पाकिस्तान श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या 6 संघांमध्ये आशिया कपसाठी महासंग्राम पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात पार पडणार आहे. या सामन्याच्या बरोबर 24 तासांआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला. विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल या आशिया कपमधील पहिल्या 2 सामन्यात खेळणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलंय. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियासाठी हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. त्यानंतर नेपाळ विरुद्ध टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. मात्र केएल राहुल बाहेर पडल्याने टीम इंडियाची बाजू नाजूक झाली आहे. अशात आता केएल राहुल याच्या जागी टीममध्ये विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
संजू सॅमसन याचा आशिया कपमध्ये राखीव विकेटकीपर म्हणून समावेश केला आहे. तर मुख्य संघात केएल राहुल व्यतिरिक्त ईशान किशन हा देखील विकेटकीपर आहे. तसेच ईशान किशन ओपनिंगही करतो. त्यामुळे केएलच्या जागेसाठी ईशान किशन हा प्रबळ दावेदार आहे. जर टीम मॅनेजमेंटने ठरवलं तर संजू सॅमसनला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
संजूला वेस्टइंडिज आणि आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत संधी मिळाली. मात्र आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याचा अपवाद वगळता संजूला संधीचं सोनं करता आलं नाही. संजूने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 मध्ये 40 धावांची वादळी खेळी केली होती. त्यामुळे संजूची गेल्या काही मालिकांमधील आकडेवारी पाहता टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
आशिया कप 2023 भारतीय संघ | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)