मुंबई : हिंदू धर्मात, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचा (Shrawan Putrada Ekadashi) उपवास केला जातो. हे व्रत नियमानुसार पाळल्यास इच्छुक व्यक्तीला संतान प्राप्ती होते आणि जीवनात प्रगती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुत्रदा एकादशीला भारतातील विविध राज्यांमध्ये पवित्रोपण किंवा पवित्र एकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत यावेळी 27 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी पाळले जाईल. विशेष म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक एकादशीचे व्रत शुक्ल पक्षात पाळले जाते, तर दुसरे एकादशीचे व्रत कृष्ण पक्षात पाळले जाते. अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी व्रत असतात, मात्र जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा 26 एकादशी येतात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे, कारण ही एकादशी संततीचे वरदान देणारी मानली जाते. हे व्रत केल्याने भगवान शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)