मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातच बंड करून भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. ज्या अजित पवारांना कंटाळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी शिवसेना सोडली, त्याच अजित पवारांसोबत आता शिंदे गटाला सत्तेत राहावं लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. आता दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही तोच सवाल शिंदे गटाला करून डिवचण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार त्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून थेट शिंदे गटाला निशाण्यावर घेण्यात आलं आहे. अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे टोळीचे चेहरे काळे ठिक्कर पडले होते. राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेनेला सोडलं. अजित पवार आमच्या मतदारसंघात घुसखोरी करत होते. आमचे मतदारसंघ गिळंकृत करत होते. त्यामुळे पुढच्यावेळी आम्ही निवडूनही आलो नसतो. अजित पवार आम्हाला निधीही देत नव्हते. अशाने शिवसेनाच संपुष्टात येणार होती, असा दावा शिंदे गटाने केला होता. आता ते काय करतील? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
अजितदादांच्या नावाने आकांडतांडव करणारे आता काय करणार? असा थेट सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. अजित पवार आता सरकारमध्ये आले आहेत. निधीचे वाटप करणारे अर्थ खातेही त्यांच्याकडे आले आहे. हा शिंदे गटाच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. ज्यांनी स्वाभिमानासाठी शिवसेना सोडत असल्याच्या बतावण्या केल्या त्यांचे आता नशीबच फुटले आहे. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हा खरा कालच्या शपथविधीचा अर्थ आहे. एक मिंधे जाऊन आता दुसरे येणार आहेत. यातून राज्याला काय मिळणार आहे? असा सवाल करतानाच महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. ते पाहून मन विषण्ण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वैभवाला व्यापारी राजकारणाची दृष्ट लागल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.
याच अग्रलेखातून अजित पवार यांनी बंड का केलं यावरही भाष्य करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. छगन भुजबळ जामिनावर आहेत. हसन मुश्रीफांवर ईडीच्या अटकेची तलवार आहे. ते सुद्धा हंगामी जामिनावर आहेत. सुनील तटकरे यांचे पायही खोलात आहेत. सगळ्यांची प्रगती पुस्तके तपास यंत्रणांच्या शेऱ्यांनी भरलेली आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर इक्बाल मिर्चीशी व्यवहार केल्याचा आरोप असून त्यांची संपत्ती जप्त केलेली आहे. आता पटेल यांची संपत्ती मोकळी होईल आणि ते केंद्रीय मंत्री होईल, असं सांगत या सर्व कारणांमुळेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.