अजितदादांनी कितीही उत्तर सभा घेऊद्यात, पण…; अजित पवार गट उत्तर सभेवर अमोल कोल्हे बरसले

| Updated on: Aug 22, 2023 | 10:16 AM

Amol Kolhe on Ajit Pawar Group Uttar Sabha : दिलीप वळसे पाटील यांनी आत्मचिंतन करावं;'त्या' वक्तव्याला खासदार अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर. शरद पवार यांच्या सभेला आता अजित पवार गट उत्तर सभा घेणार आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांनी कितीही उत्तर सभा घेऊद्यात, पण...;  अजित पवार गट उत्तर सभेवर अमोल कोल्हे बरसले
Follow us on

पुणे | 22 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 17 ऑगस्टला बीडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी अजित पवार गट आणि विशेषत: धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं. शरद पवार यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा झाली. शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आता लवकरच अजित पवार गट उत्तर सभा घेणार असल्याचं बोललं जात आहे. याच उत्तर सभेला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने निर्यातीवर 40 % कर लावल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. पुण्यातील आळेफाटा इथे शेतकरी आज रास्ता रोको आंदोलन करत आहेत. यावरही अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कितीही उत्तर सभा झाल्या तरी बळीराजाच्या प्रश्नांना उत्तर देणं जास्त महत्त्वाचं आहे. राजकारणात अडकण्यापेक्षा महाराष्ट्राचा बळीराजा संकटात आहे. त्यासाठी उपाययोजना करणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी राजकारण न करता बळीराजाला दिलासा द्यावा, असं म्हणत अजित पवारांच्या उत्तर सभेवर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यावरून सध्या चर्चा होतेय. त्याला आता अमोक कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आत्मचिंतनाचा पर्याय उपलब्ध त्यांनी आत्मचिंतन करावं. या विधानावरची माझी भूमिका पुढच्या दोन दिवसात तुम्हाला कळेल. इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी भाष्य करणं, योग्य नाही. दिलीप वळसे पाटलांकडे राजकारणाला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्याकडून अशा वक्तव्यांची अपेक्षा नाही. त्यांनी सांभाळून बोलावं, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

पुण्यातील आळेफाटा इथं आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करत आहेत. कांदा निर्यातीवर 40 टकके शुल्क लागू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.  अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे जुन्नरचे तटस्थ आमदार अतुल बेनकेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी रास्ता रोकोमध्ये सहभागी होणार आहेत.

अमोल कोल्हे यांनी या आंदोलनावर भाष्य केलंय. 40 टक्के कर वाढवण्याचा निर्णय अत्यंत तुघलकी आणि दुर्दैवी आहे. ही तर अघोषित निर्यात बंदी आहे. केंद्र सरकार कधीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभ राहिलं नाही. संसदेत देखील याचे अनेकदा पडसाद उमटले. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज रास्ता रोको करणार दोन महामार्ग रोखून धरणार आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवायचा नाही का? सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान बघवत आहे का? आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत. सरकारने याबाबत ठोस पावलं उचललीच पाहिजेत, असं अमोल कोल्हे म्हणालेत.