2024 ची निवडणूक आत सोपी राहिली नाही, कारण…; आगामी निवडणुकीवर संजय राऊत यांचं ‘रोखठोक’ भाष्य

| Updated on: Aug 13, 2023 | 8:17 AM

Saamana Editorial on loksabha Election 2024 : नेहरू वंशाचा 'गांधी', 2024 च्या विजयाचं रणशिंग; आगामी निवडणुकीवर सामनातून 'रोखठोक' भाष्य देश परिवर्तनाच्या दिशेने वेगात निघाला आहे! 2024 च्या विजयी लढाईचे रणशिंग फुंकण्यात आले आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

2024 ची निवडणूक आत सोपी राहिली नाही, कारण...; आगामी निवडणुकीवर संजय राऊत यांचं रोखठोक भाष्य
Follow us on

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : सार्वत्रिक लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशातच INDIA आणि NDA या दोन्ही आघाडीकडून विजयाचा दावा केला जात आहे. अशाच जिंकणार तर INDIA चं असा दावा सामनातून करण्यात आला आहे. ‘नेहरू वंशाचा ‘गांधी’, 2024 च्या विजयाचं रणशिंग’ या शीर्षकाखाली आजचं सामनाचं रोखठोक सदर प्रसिद्ध झालं आहे. राहुल गांधी पुन्हा संसदेत पोहोचले व अविश्वास ठरावाच्या चर्चेत त्यांनी जोरदार हल्ले केले. 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी नेहरू वंशातील एक ‘गांधी’ मोदी-शहांच्या मनमानी सत्तालोलुपतेविरोधात उभा राहिलेला देशाने पाहिला. श्री. मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचं ‘रोखठोक’ सदर जसंच्या तसं

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मुठीतून सत्तेची वाळू सटकत आहे. 2024 पर्यंत त्यांची मूठ रिकामी झालेली असेल हे आता स्पष्ट झाले आहे. देशाचे मोठेपण कशात असते ते देशाची लोकसंख्या, उंच इमारती, महागड्या गाडय़ा यावर ठरत नसते. ते राज्यकर्त्यांचे चारित्र्य व स्वातंत्र्याविषयी त्यांच्या मनात किती आदराचे स्थान आहे यावर ठरत असते. आज ते मोठेपण राहिलेले नाही.

श्री. राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने संसदेतून काढले. त्यासाठी गुजरातच्या भूमीवरील न्याय यंत्रणा व कायद्याचा गैरवापर केला. तेच राहुल गांधी सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळी संसदे पोहोचले. एखाद्या वीराप्रमाणे त्यांचे स्वागत झाले. अविश्वास ठरावावर ते खणखणीत बोलले. तेव्हा भाजप सदस्यांनी फक्त गोंधळ घालण्याचेच काम केले.

राहुल गांधी हे आदल्या दिवशी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पोहोचले. सोबत सोनिया गांधी होत्या. मध्यवर्ती सभागृहात बसलेले भाजपचे सदस्य तेव्हा पळून गेले. राहुल गांधी जवळ आले व त्यांनी हस्तांदोलन केले तर ‘वर’पर्यंत वृत्त जाईल व नोकरी गमवावी लागेल हे भय आज दिल्लीत सर्वत्र आहे.

राहुल गांधी यांनी अविश्वास ठरावावर लोकसभेत भाषण केले. ते संपूर्ण देशाने पाहिले. ‘अध्यक्ष महोदय, भाजपातील माझे मित्र तणावाखाली आहेत, पण त्यांनी ‘टेन्शन’ घेऊ नये. आज मी त्यांच्या प्रिय अदानींवर बोलणार नाही.’ असे सुरुवातीला बोलून गांधी यांनी भाजपची दांडीच उडवली. पुढील तासभर गांधी गडगडत राहिले व बरसत राहिले.

9 ऑगस्ट हा क्रांतिदिनाचा, ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या महात्मा गांधीकृत घोषणेचा दिवस. त्याच दिवशी नेहरू वंशातील एका गांधीने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश भारतीय संसदेत दिला. देशातले वातावरण आज तसेच आहे. ‘चले जाव’ आंदोलनाशी, स्वातंत्र्य लढय़ाशी काडीमात्र संबंध नसलेले लोक आज सत्तेवर आहेत व ते राहुल गांधींविरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत होते.

मुंबईतील आगस्ट क्रांती मैदानातून गांधींनी ‘भारत छोडो’चा आदेश 9 ऑगस्ट 1942 ला दिला. त्या क्रांतिस्तंभावर फुले वाहण्यासाठी गांधींचे पणतू तुषार गांधी पोहोचले. त्यांना पोलिसांनी रोखले; कारण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तेथे येणार होते व त्यांना सगळ्यात आधी तेथे फुले वाहायची होती. ज्यांनी सारी हयात गांधींचा द्वेष केला ते सर्व लोक ‘भारत छोडो’ Quit India चे नारे देत होते. श्री. राहुल गांधी विचलित न होता आपले भाषण करीत राहिले. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी तावातावाने स्मृती इराणी उभ्या राहिल्या; पण त्यांच्याकडे एक मिश्किल कटाक्ष टाकत राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. राहुल गांधींचा पराभव करून 2019 साली स्मृती इराणी निवडून आल्या, पण 2024 साली अमेठीची जनता चूक सुधारेल.

श्रीमती प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी असे अनेकांचे आज मत आहे. प्रियंका गांधी यांच्याशी मोदी यांना मुकाबला करावा लागेल व निकाल काय लागेल ते कोणीच सांगू शकणार नाही. श्री. मोदी हे गुजरात व वाराणसी अशा दोन मतदारसंघांतून निवडणुका लढवतील, पण वाराणसी त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही. देशाचे वातावरण आणि वारे पूर्ण बदलत आहेत.