छत्रपती संभाजीनगर : अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नक्की काय होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सविस्तर भाष्य केलं.क्रिकेट मॅचचं उदाहरण देत सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाची पुढची रणनिती सांगितली. तसंच आगामी निवडणुकांवरही भाष्य केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही तटकरेंनी टीका केली आहे.
मी सुद्धा क्रिकेटमधला खेळाडू आहे. अचूक टप्प्यावरच्या चेंडूला देखील काही काही वेळेला षटकार बसू शकतो. आम्ही केवळ मेडण ओवर काढण्यासाठी मैदानात उतरलो नाही. तर मार्च एप्रि मध्ये येणारी टी ट्वेंटी आम्हाला जिंकायची आहे. 50 षटकाचे सामने आम्हाला ऑक्टोबरमध्ये जिंकायचे आहेत. नॉन लिविंग टेस्ट सचिन गावस्करप्रमाणे पुढच्या पाच वर्षासाठी आम्हाला चालू ठेवायचं आहे. या तिन्ही पद्धतीच्या खेळासाठी म्हणूनच आम्ही तयार झालेलो आहोत, असं सुनील तटकरे म्हणाले.
संजय राऊत चांगले संपादक आहेत. ते माझ्या जिल्ह्यातील आहेत. माझा त्यांचा चांगला परिचय आहे. मात्र त्यांचं थोडं मानसिक संतुलन बिघडल्यासारखंच झालं चित्र निर्माण झाला आहे. केवळ रोज वेगवेगळी वक्तव्य करणं. माध्यमांसमोर जाणं हा त्यांचा एकमेव उद्देश नजरेसमोर ठेवून ते रोज काम करतात, असं म्हणत सुनील तटकरे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 2019 ला शब्दप्रयोग होता की खिडकी उघडलं की पाऊस आणि टीव्ही लावला की राऊत तशी परिस्थिती होती. आता संजय राऊत यांच कुठलाही मत महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने घेत नाहीत, असंही ते म्हणाले.
शरद पवारांना अजित पवार यांच्या भेटीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांनी मत व्यक्त केलेला आहे. या संदर्भात मी काही बोलणार नाही. अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत. आगामी निवडणुका अजितदादांच्या नेतृत्वात घड्याळाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहोत, असंही सुनील तटकरे म्हणालेत.
उद्धव ठाकरे निर्धार करत आहेत. त्यांचा फुटलेला पक्ष अधिक फुटू नये, यासाठी जनतेमध्ये जात आहेत. पण जनतेची सेवा करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि व्यापक प्रमाणामध्ये जनाधार एनडीएच्या पाठीशी आहे. पावसाने ओढ दिली आहे. मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परभणीला येत असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जी बैठक घेतली. त्याचा सारासार विचार करत सरकार शेतकऱ्यांचा विचार करेल, असं सुनील तटकरे म्हणालेत.