मुंबई : मागच्यावर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार पक्षातून बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजपामधील संघर्ष अधिक तीव्र झाला. उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात कुठे सभा झाली की, या शाब्दीक लढाईला आणखी धार चढते. कारण उद्धव ठाकरे या सभेतून भाजपावर जोरदार हल्ला चढवतात. उद्धव ठाकरे यांनी काही माहिन्यापूर्वी एका सभेतून भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस यांची फडतूस गृहमंत्री, नागपूरचा कलंक अशी खिल्ली उडवली होती. त्यावेळी भाजपाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. रविवारी उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा झाली. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे ‘मी असं नाही, बोलणार हे बोलून बरच काही बोलून गेले. आता त्यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये नवीन सामना सुरु झाला आहे.
‘एकदा फडतुस बोललो, कलंक बोललो’
“उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थापाड्या असा केला. मी त्यांना एकदा फडतुस बोललो, कलंक बोललो, आता नाही बोलणार. थापाड्या बोलायचय होतं, पण आता नाही बोलणार” असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंगोलीतील सभेतून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळजळीत टीका केली. त्यालाच आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाने काय इशारा दिला?
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या फडणवीसांबद्दलच्या वक्तव्याचे मोठे पडसाद उमटतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
‘आम्ही सुद्धा तो रोखू शकणार नाही’
“राज्यात दुष्काळ असताना देवेंद्र फडणवीस जापानला गेले. टरबुजाच्या झाडाला सुद्धा पाणी लागतं” असं उद्धव म्हणाले. त्यावर बावनकुळे म्हणाले की, “या टीकेवरुन मोठा उद्रेक होईल. मुंबईतही त्याचे पडसाद उमटतील. आम्ही सुद्धा तो रोखू शकणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आम्ही मर्यादा सोडली, तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल”
‘मी त्यांना खरबुज्या नाही म्हणणार’
“उद्धव ठाकरे हे कपाळ करंटे असून कोविड काळातील भ्रष्टाचाराने कलंकीत झाले आहेत. मी त्यांना खरबुज्या, फावड्या असं काही म्हणणार नाही” असं भाजपा नेते प्रविण दरेकर म्हणाले.