ठाणे | 20 ऑगस्ट 2023 : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. गेल्या 8 वर्षापासून ते ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर आज त्यांची सुटका झाली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. रमेश कदम तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. ढोल ताश्यांच्या गजरात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे संपूर्ण तुरुंग परिसर दणाणून गेला होता. यावेळी तुरुंगाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहोता.
माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून आज जामिनावर सुटका झाली. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे ते तब्बल 8 वर्ष तुरुंगात होते. आठ वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षेनंतर त्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. रमेश कदम यांची आज सुटका होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती. मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून मातंग समाजाचे कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर जमले होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
रमेश कदम हे तुरुंगातून बाहेर येताच त्यांना फेटा घालण्यात आला. त्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण करत ढोलताशे वाजवण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ढोलाच्या तालावर ठेकाही धरला. एकमेकांना पेढेही भरवण्यात आले. तब्बल अर्धा तास हा जल्लोष सुरू होता. त्यानंतर रमेश कदम हे बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी निघून गेले.
रमेश कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार होते. नंतर त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये तुरुंगात असताना अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे विकास आर्थिक महामंडळातील घोटाळ्या प्रकरणी अनेक आरोप आहेत. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी हे घोटाळे केले होते.
त्यांच्यावर सोलापूर, पुण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल 312 कोटी रुपयांचा हा कथित घोटाळा असल्याचं सागितलं जात आहे. या प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे ते आठ वर्ष तुरुंगात होते. आज अखेर 11 वाजता त्यांची तुरुंगातून सुटका झाली.