महायुतीत मनोमनी धुसफूस? गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्यासमोर ‘ती’ सल बोलून दाखवली

| Updated on: Aug 28, 2023 | 8:53 PM

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगायच्या. त्यानंतर आता राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये देखील सारं काही आलबेल नाही, असं चित्र बघायला मिळत आहे. कारण आज पुण्यातील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्यासमोर एक सल बोलून दाखवली आहे. त्यांनी हसत-हसत आपली सल बोलून दाखवली आहे.

महायुतीत मनोमनी धुसफूस? गिरीश महाजन यांनी अजित पवार यांच्यासमोर ती सल बोलून दाखवली
Follow us on

पुणे | 28 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार आणखी रखडला आणि नव्या मंत्र्यांसाठी विद्यमान मंत्र्यांकडे असलेल्या खांत्यामध्येही आदलाबदल करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली अनेक चांगली खाती अजित पवार यांच्या गटाला मिळालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं गृहखातं अजित पवार यांच्याकडे गेलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे असणारं कृषी खातं अजित पवार यांच्या गटाकडे गेलं.

याशिवाय अनेक महत्त्वाच्या खात्यांची आदलाबदल झाली. याबाबत विद्यमान मंत्र्यांमध्ये मनोमनी धुसफूस असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. विशेष म्हणजे खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी उघडपणे भर कार्यक्रमात याबाबतची सल व्यक्त केली आहे. त्यांनी विनोदी पद्धतीने आपली सल बोलून दाखवली आहे. अजित दादा आमच्याकडे आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेतलं, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

क्रीडा पुरस्काराच्या कार्यक्रमात गिरीश महाजनांचं वक्तव्य

पुण्यात छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपली सल बोलून दाखवली. अजित पवार आमच्यासोबत आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेण्यात आलं. आता ते का काढून घेतलं? ते मला आणि अजित दादांनाच माहिती. ते मी इथे सांगणार नाही, असं महाजन म्हणाले.

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“अजित दादा आपल्याकडे आले आणि दादांनी माझं खातं काढून घेतलं. त्याचं कारण मी आता सांगत नाही. ते दादा आणि मलाच माहिती आहे. पण मला निश्चितच या गोष्टीचा आनंद आहे की, तीन वर्षे रखडलेला हा पुरस्कार खूप मेहनत घेऊन, आम्ही यावर खूप मेहनत घेतली. आम्ही सगळ्या तांत्रिक बाजू पडताळून बघितल्या आणि आज त्याचा शूभ मुहूर्त निघाला”, असं गिरीश महाजन आपल्या भाषणात म्हणाले.