पुणे : एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवार हिची तिच्या मित्राने हत्या केली, असं म्हणतात, जगाच्या तोंडाला झाकण नसतं, दर्शना पवार हिच्यासोबत, तिच्या मृत्युनंतरही तेच होत आहे. दर्शना पवार हिला दोष देण्यात काहीही तथ्य नाही. कारण कुणाचीही हत्या करणारा हा सर्वात मोठा दोषी असतो, ज्याची हत्या झाल तो नाही. दर्शना गेली पण तुमच्या घरातही दर्शनाची उदाहरणं दिली जात असतील, पाहा कसं झालं तिचं?, किती हुशार मुलगी होती?, पण कसं नुकसान करुन बसली?
प्रत्येक घरात दर्शनासारखी हुशार मुलगी जन्माला यावी, असं सर्वांना वाटेल. कदाचित आपल्या घरातही एक दर्शना आहे. पण त्या दर्शनासोबत कुटूंबातील कुणाचा संवाद आहे का हे महत्त्वाचं आहे.दर्शनासोबत जर घरातील कुणाचाच संवाद नसेल, तर दर्शनासोबत वाईट घडणार नाही हे कशावरुन.नेमकं काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला अजूनही समजत नसेल, तर एका साध्या सोप्या भाषेत समजून घेऊ या.
दर्शनासारखी मुलगी प्रत्येकाच्या घरात असते. दर्शनासोबत जे वाईट घडलं, जवळच्या मित्राला लग्नासाठी नकार दिला, म्हणून तिची त्याने हत्या केली. हे ऐकून प्रत्येक ज्या घरात मुलगी आहे, त्यांना धक्का बसला. हे स्वाभाविक आहे. पण आपण आपल्या घरातील दर्शनाची काय काळजी घेण्यास कमी पडत आहोत, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. आपल्या घरातील मुलीला आपण नेहमीच गृहीत धरत आलो आहोत.
गृहीत धरत असताना आपण हाच विचार करतो. ती माझी मुलगी आहे, ती असं काही करणार नाही.तिला सर्व काही समजतं. पण जगाची ओळख,जगातील तुमचे अनुभव तिला देणे गरजेचे असते. तुमची ही कन्या मोठी होत असते, तसं तुमचं गृहीत धरणं आणखी पक्कं होत असतं.हे सर्व गृहीत धरताना तुमचा तुमच्या मुलीसोबतचा संवाद आणखी कमी होतो, संपल्यासारखा असतो. पण तरीही तुम्हाला वाटतं नाही, ती जे काही करणार आहे, ते योग्यच नसेल. पण तुमच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्यच नाही.
हे गृहीत धरणंच कधी कधी आपल्याला आणि तिला महागात पडतं. तुमची मुलगी जेवढी मोठी होत आहे, तेवढाच तुमचा तिच्याशी संवाद वाढला पाहिजे. एवढा की तुम्ही तिच्यासोबत प्रत्येक विषयावर मित्रासारखं बोललं पाहिजे. तिच्या मनातील प्रत्येक चलबिचल, तिने तुम्हाला सांगितली पाहिजे. अगदी मनापासून. जेव्हा बापाची आणि आईची प्रेमाची भिंत तिच्या आजूबाजूला असेल, तेव्हा या भक्कम प्रेमाच्या बुरुजात कधीच बाहेरचा माणूस येऊ शकत नाही. याचा गैरफायदा कुणीच घेऊ शकत नाही. तसेच तिला या बाहेरच्या व्यक्तीची गरजही वाटणार नाही.
तिला काही आर्थिक अडचणी असतील, भविष्यातील स्वप्न तिची काय आहेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती मदतीचे ठरणार आहात. तिचे मित्र आणि मैत्रीण तिच्याशी कसं बोलतात, वागतात. तिचे त्यांच्याविषयी काय मतं आहेत.ती चुकीची आहेत की बरोबर यावर तुमचे सल्ले तिला नेहमीच मिळत राहतील. पण तुमची रोजची कामं या संवादात आडवी येत असतील, तर ही मुलगी विचाराने आणि मनाने तुमच्याशी दुरावते आणि नको तो निर्णय घेऊन बसते.
एवढंच सांगता येईल, तुमच्या घरातील तुमच्या मुलीशी संवाद कमी होवू देऊ नका, तर तो सतत वाढवा, तिला लगेच कोणत्याही गोष्टीवर अडवू नका, ती काय विचार करतेय, हे आधी समजून घ्या. यानंतर तिला यावर योग्य तो सल्ला द्या, पण संवाद हरवू देऊ नका. या संवादात थोडाही दुरावा आला, तर त्यातून वाईट होण्याचाच धोका जास्त आहे.