पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन भाजपामधील अंतर्गत नाराजी समोर आली होती. पुणे कोथरुडमधील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरुन जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. आपण जुन्या कार्यकर्त्या आहोत, असं असताना पुणे शहरातील भाजप नेत्यांकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. चांदणी चौक उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत छायाचित्र नाही, हा त्यांचा आक्षेप होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.
मेधा कुलकर्णी कोणावर नाराज?
मात्र, अजूनही पुणे भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. मेधा कुलकर्णी यांची नाराजी अजूनही दूर झालेली दिसत नाहीय. मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या माजी आमदार आहेत. ही जागा त्यांना माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावी लागली होती. चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन त्यांची नाराजी उफाळून आली. त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.
शहरातील 240 जाहिरात फलकांवर त्यांचे फोटो
त्यानंतर कोथरूड मंडल अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे पुनीत जोशी यांनी काही मत मांडली. शहरातील 240 जाहिरात फलकांवर मेधा कुलकर्णी यांचे छायाचित्र लावले होते, ही बाब त्यांनी दुर्लक्षित का केली? नाराजी असली तरी ती जाहीर करायची नाही, अशी पक्षाची शिकवण आहे असं पुनीत जोशी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दोन दिवसात कुठे होणार बैठक?
आता या वादात भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत. भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. या बैठकीत मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर केली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबईत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.