मुलाला नागपूरच्या विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता, त्याला तेथे सोडून पुण्याला परतत होते, पण…

| Updated on: Jul 01, 2023 | 1:05 PM

मुलाला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आई-वडिल आणि बहिण गेले होते. मेव्हणा फोन करत होता, मात्र संपर्क होत नव्हता. काही वेळात बस अपघाताची बातमी आली.

मुलाला नागपूरच्या विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता, त्याला तेथे सोडून पुण्याला परतत होते, पण...
समृद्धी महामार्गावरील अपघाता पुण्यातील गंगावणे कुटुंबाचा अंत
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला आणि 25 प्रवाशांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील मृतांमध्ये पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील गंगावणे कुटुंबीयांचाही समावेश होता. गंगावणे कुटुंबीयांच्या मृत्यूमुळे आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात शोककळा पसरली आहे. कैलास गंगावणे, कांचन गंगावणे आणि सई गंगावणे अशी मयत गंगावणे कुटुंबीयांची नावे आहेत. गंगावणे यांच्या मुलाला नागपूरला महविद्यालयीन शिक्षणासाठी सोडून पुण्याला परत येत असतानाच हा अपघात घडला. पहाटे कुटुंबीयांच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

गंगावणे कुटुंब नागपूरहून पुण्याला परतत होते

मूळचे शिरुर येथील असलेले गंगावणे कुटुंब नोकरीच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे राहत होते. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात कैलास गंगावणे हे गेली 27 वर्षे प्राध्यापक म्हणून काम करत होते. गंगावणे यांची मुलगी सई हिने गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला होता, ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती. तर मुलाला नागपूर येथील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.

आई-वडिल आणि मुलगी मुलाला नागपूर येथे सोडण्यासाठी गेले होते. मुलाला सोडून ते विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने पुण्याला परत येत होते. मात्र वाटेतच समृद्धी महामार्गावर त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गंगावणे यांचा मेव्हणा अमर काळे बहिण, भावोजी आणि भाचीला फोन लावत होते, मात्र तिघांचाही फोन लागत नव्हता. यानंतर बसच्या अपघाताची माहिती मिळाली.

हे सुद्धा वाचा

मेव्हण्याने तिघांचा शोध घेतला असता घटना उघड

बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अमर काळे यांनी बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीने माहिती घेतली. नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव होते. तसेच त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षापर्यंत पोलीस आले. अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. विद्यालयात शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे.