वसई / 29 ऑगस्ट 2023 : निर्माल्य टाकायला गेलेले पिता-पुत्र समुद्रात बुडाल्याची घटना वसईत उघडकीस आली आहे. वसईतील किल्लाबंदर कस्टम जेटीवर ही घटना घडली आहे. शैलेश गजानन मोरे आणि देवेंद्र शैलेश मोरे अशी बुडालेल्या पिता-पुत्रांची नावे असून, ते वसई पश्चिम दिवनमान परिसरातील राहणारे आहेत. निर्माल्य टाकून बाप-लेक सेल्फी काढत असताना त्यांचा समुद्रात तोल गेल्याने ते बुडाले असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. घटनेची माहिती वसई पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी समुद्रात शोधमोहिम सुरु केली आहे. मात्र अद्याप दोघांचे मृतदेह सापडले नाहीत.
वसई पश्चिमेतील दिवनमान परिसरात राहणारे मोरे पिता-पुत्र बाईकवरुन वसई किल्लाबंदर जेटीवर निर्माल्य सोडायला गेले होते. निर्माल्य सोडून झाल्यानंतर बाप-लेकाला सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. बाप-लेक सेल्फी घ्यायला गेले अन् तिथेच घात झाला. दोघेही तोल जाऊन समुद्रात पडले. स्थानिक रहिवाशांनी ही माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली. समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या बाईकवरुन पिता-पुत्राची ओळख पटवण्यात आली.
किल्लाबंदरचे सामाजिक कार्यकर्ते व्हॅलेंटाईन मिरची आणि त्यांच्या “वसई युवा बल” संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने दोघा पिता-पुत्रांचा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहेत. मात्र अद्याप पिता-पुत्राचा शोध लागला नाही.