पुणे : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवलं आहे. त्यावरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात शुल्क वाढीचे आज दुसऱ्या दिवशीही पडसाद उमटणार आहेत. नाशिकमधील लासलगाव ही कांद्याची मुख्य बाजारपेठ आहे. आज लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. कडकडीत बंद पाळण्यात येईल. दुसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद राहिल्यामुळे 60 ते 70 कोटींची उलाढाल ठप्प राहणार आहे.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता कांदा लिलाव सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांशी बैठक होईल. ही बैठक महत्त्वाची असेल. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली येथे याच मुद्यावर वाणिज्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत काही तोडगा निघतोय का? याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.
शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत कांदा खराब होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांकडून कांदा निवडण्याचं काम सुरू आहे. बाजार समित्या बंद राहिल्यास राहिलेला माल देखील खराब होण्याची भीती आहे. कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. पारनेर तालुक्यातील निघोज येथे शेतकरी आणि शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील. काल देखील नगरच्या नेप्ती कांदा मार्केट येथे जीआरची होळीकरून केला शासनाचा निषेध करण्यात आला होता.
अमोल कोल्हे यांनी काय आरोप केला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात पुणे आळेफाटा मुख्य चौकात शेतकरी आंदोलन करणार आहेत. “ही एकप्रकारची अघोषित निर्यात बंदी आहे. मागच्या तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्याच्या पिकाला मोलभाव, रास्त दर मिळत नव्हता. 2 ते 5 रुपये किलोने कांदा विकावा लागला. त्यावेळी केंद्र सरकार कुठेही कांद्या उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभं राहिलं नाही. याचे विधानसभा, संसेदत पडसाद उमटले. वाहतूक खर्चही शेतकऱ्याच्या अंगावर पडला. आता दोन पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली, तेव्हा केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढवून काद्याचे भाव पाडण्यााच षडयंत्र केलय” असा आरोप अमोल कोल्हे यांनी केलाय.