अमरावती : माझ्यामुळे अनेकजणांच्या कंबरेचे आणि गळ्याचे पट्टे निघाले. सर्वजण फिरायला लागले. घराबाहेर पडले. नाही तर घरातच बसून होते, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. मी रुग्णालयात असताना हुडी घालून रात्रीच्या हालचाली कुणाच्या सुरू होत्या? कोण फिरत होतं?, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. अमरावतीत मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.
मी रुग्णालयात असताना मला हलता येत नव्हतं. पण यांच्या रात्रीच्या हालचाली सुरू होत्या. हुडी घालून कोण फिरत होतं? त्याचं उत्तर आधी द्या, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. काही लोकांना काही काळापुरतं महत्त्व मिळतं. नंतर ते आठवणीत राहत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. गेली अनेक वर्ष शिवसेनाच अमरावतीत जिंकत आली आहे. गेल्यावेळी थोडी चूक झाली. त्यामुळे काही लोकं कारण नसताना संसदेत जाऊन बसली. पण त्यांचं महत्त्व काही काळापुरतच असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला येत होतं. हल्ली सरकार खोक्यातून येतं. तुम्ही मतदान कुणालाही करा, सरकार आमचंच येणार असा पायंडा पडणं घातक आहे. कुणीही दमदाट्या आणि पैशाचा वापर करून सरकार बनवू शकतो असंच सध्याचं चित्र आहे. त्यामुळे राईट टू रिकॉलचा अधिकार दिला पाहिजे. लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यावर विचार व्हावा. देशाने विचार केला पाहिजे. चुकीचं काही करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बोलण्याचा अधिकार हवा. बाळासाहेब ठाकरे यांनीही ही मागणी केली होती, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री व्हायचं माझं कधीच स्वप्न नव्हतं. अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचाच असं वचन मी वडिलांना दिलं होतं. मी अमित शाह यांना तसं सांगितलं होतं. त्यामुळेच अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला. बरं मी झालो पंतप्रधान काय फरक पडणार आहे? देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणीबाणीनंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी होती. साहित्यिक रस्त्यावर उतरले होते. आज तेवढीही मुभा राहिली नाही, असंही ते म्हणाले.
आम्ही विरोधक नाही. मी आम्हाला विरोधक म्हणत नाही. आमची एकजूट ही देशप्रेमींची एकता आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केलं आहे. रक्त सांडलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देशप्रेमी एकत्र आले असतील तर त्यांना विरोधी म्हणू शकत नाही, असंही ते म्हणाले.