मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, संजय राऊत यांची खोचक टीका; तुम्ही आराम करायला की राज्य…

| Updated on: Aug 13, 2023 | 11:11 AM

आता हे खोटं बोलत आहेत. हे भंपक लोकं आहेत. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहेत. पंतप्रधानांकडून तरी अपेक्षा नाही. तुम्ही देशात खोटं बोलता. पण महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलू नका.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, संजय राऊत यांची खोचक टीका; तुम्ही आराम करायला की राज्य...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते साताऱ्यातील दरे या गावी आराम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबरदस्ती रुग्णालयात दाखल करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजारावर टीका करणारे मुख्यमंत्री आजारी पडले आहेत. तुम्ही आराम करायला मुख्यमंत्री झालात की राज्यकारभार करायला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली हे मला कळलं. ते आराम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती आराम करत आहेत? उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्याने आपण राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झाला की आराम करायला मुख्यमंत्री झाला आहात याचा विचार करावा. आजच वाचलं आरामाला गेले आहेत. करू द्या, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला आहे.

हे सुद्धा वाचा

मोदी-शाह यांनी युती तोडली

यावेळी त्यांनी युतीच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. दिल्लीत एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये आम्ही युती तोडली नाही. शिवसेनेने तोडली. हे विधान असत्य आहे. मी आधीच सांगितलं. 2014मध्ये भाजपने एका जागेवरून युती तोडली. ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली होती. खडसेंनी याबाबत परवा स्पष्ट केलं होतं. 2014ची युती मोदी आणि शाह यांच्या सूचनेवरून तोडली. तेव्हा मोदींची हवा होती. त्यांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकायचा होता. त्यामुळे 25 वर्षाची युती त्यांनी तोडून फेकून दिली, असा दावा राऊत यांनी केला.

शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी युती तोडली

2019मध्येही त्यांनीच युती तोडली. युती करण्यासाठी अमित शाह मातोश्रीवर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा काय झाली हे वरळीतील पीसीत फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. युती, जागा वाटप आणि सत्ता वाटप यावर आमचं एकमत झालं आहे. सत्ता वाटप फिफ्टी फिफ्टी होईल असं फडणवीस म्हणाले होते.

2019मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते. पण भाजपने त्यांना मुख्यमंत्री देण्यास नकार दिला. त्यांनी विचारलं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण? आम्ही शिंदे यांचं नाव घेतलं. कारण ते विधीमंडळाचे नेते होते. पण भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. युती तुटण्याचं कारण शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद होतं, असा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधानांकडून अपेक्षा नव्हती

आता हे खोटं बोलत आहेत. हे भंपक लोकं आहेत. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहेत. पंतप्रधानांकडून तरी अपेक्षा नाही. तुम्ही देशात खोटं बोलता. पण महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलू नका. ज्याला पुरावे आहेत त्याबाबत तरी खोटं बोलू नका. ज्या शिंदेंच्या नावाला विरोध केला नंतर त्यांनाच मुख्यमंत्री केलं. याचा अर्थ तुम्ही किती कारस्थानी आणि कपटी आहात हे दिसून येतं. त्यांच्या मनात शिवसेनेचा किती द्वेष आहे हे ही दिसून येतं, असा हल्लाही त्यांनी चढवला.