मोदी म्हणाले, मी पुन्हा येईन; संजय राऊत यांनी वाजपेयींच्या काळातील ‘त्या’ कॅम्पेनची दिली आठवण

| Updated on: Aug 17, 2023 | 11:35 AM

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मी परत येईन या घोषणेची खिल्ली उडवली आहे. मोदी यांच्या या घोषणेची खिल्ली उडवतानाच त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका कॅम्पेनची त्यांना आठवणच करून दिली आहे.

मोदी म्हणाले, मी पुन्हा येईन; संजय राऊत यांनी वाजपेयींच्या काळातील त्या कॅम्पेनची दिली आठवण
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. यावेळी मी पुन्हा येईल, असा नारा नरेंद्र मोदी यांनी दिला. मोदी यांच्या या घोषणेचं सत्ताधाऱ्यांनी स्वागत केलं आहे. तर विरोधकांना मोदी यांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. मी परत येईन ही घोषणा आपण महाराष्ट्रातही ऐकली होती. त्याचं पुढे काय झालं हे सर्वांनी पाहिलच आहे, असा चिमटा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही आता त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. मोदी यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा दिली. मोदींच्या या घोषणेचा राऊत यांनी इंडिया शायनिंगशी संबंध जोडत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील या कॅम्पेनचा दाखला दिला. वाजपेयी म्हणाले होते इंडिया शायनिंग. पण शायनिंग काही झालं नाही. काँग्रेस सत्तेवर आली, असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

27 पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण

यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. उद्धव ठाकरे या बैठकीचे यजमान आहेत. आतापर्यंत 27 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रणं गेली आहेत. पाच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. लालू प्रसाद यादव, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि फारूख अब्दुल्लांसह सर्व नेते या बैठकीला येतील. शरद पवार यांनाही निमंत्रण दिलं आहे. तयारी जोरात सुरू आहे. या बैठकीच्या निमित्ताने मुंबई, महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करताना पाहिल, असं राऊत म्हणाले.

आप आणि काँग्रेस एकत्र लढणार

काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीत स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकी झडत आहेत. दोन्ही पक्षातील वाद विकोपाला जातील की काय अशी परिस्थिती आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक राज्यात अनेक पक्ष आहेत. प्रत्येकाला विस्तार करण्याचा अधिकार आहे. सीट शेअरिंगसाठी दोन्ही पक्ष बसून चर्चा करतील. मला चिंता वाटत नाही.

पंजाब असो की दिल्ली असो आप आणि काँग्रेसमध्ये चर्चा होईल. मुंबईतील बैठकीसाठी आप आणि काँग्रेसला आमंत्रण दिलं आहे. दिल्लीचं प्रकरण जुनं आहे. पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत आप आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील. एखाद दोन सीटबाबत इकडे तिकडे होईल. पण दोन्ही पक्ष एकत्र लढतील, असा दावाही त्यांनी केला.

मग खंजीर का खुपसला

आज शरद पवारांच्या बाजूने देखील लोक फुटून गेले आणि म्हणतात की शरद पवार हे आमचे लोकनेते आहेत. हे कसं काय? तुम्हाला शरद पवार कशाला हवेत? बाळासाहेब कशाला हवे आहेत? तुमच्यात धमक आणि हिंमत नाही का? शरद पवार जर देव आहेत तर त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला? बाळासाहेबांची शिवसेना का तोडली? असा सवाल त्यांनी केला.