उद्धव ठाकरे यांना मुंबई पोलिसांचा मोठा झटका, ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाआधी मोठी बातमी

| Updated on: Jun 27, 2023 | 3:16 PM

उद्धव ठाकरे यांनी 1 जुलैला मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाची गेल्या आठवड्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांपासून अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणारी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांना मुंबई पोलिसांचा मोठा झटका, ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाआधी मोठी बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीकडून मुंबईत सध्या कडक कारवाई सुरु आहे. ईडीने गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. या प्रकरणात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण हे अडचणीत आले आहेत. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय देखील अडचणीत आले आहेत. ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. असं असताना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेत सध्या भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत 1 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केलीय.  पण ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय.

येत्या 1 जुलैला शनिवार आहे. या दिवशी महापालिकेचं कामकाज बंद असतं. सर्वसामान्यांना या मोर्चाचा त्रास होऊ नये यासाठी हा मोर्चा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. महापालिकेत भ्रष्टाचार सुरु असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोर्चाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जातोय. दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ते विनंती करण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या 24 तासांपूर्वी एक प्रकरण तापलं होतं. ठाकरे गटाकडून महापालिकेच्या एच इस्ट कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी महापालिका अभियंत्याला मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे वॉर्ड ऑफिसरच्या दालनात पोलीस सुरक्षा असताना हा सगळा प्रकार घडला होता. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध ठाकरे गटाचे नेते यांच्याकडून एकमेकांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मुंबई महापालिकेत कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, ठाकरे गटाकडून केला जातोय. तर दुसरीकडे गेल्या दीड वर्षात महापालिकेत प्रशासक आहे. या काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय. याच आरोपांप्रकरणी महापालिकेवर ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार होता.