‘हा हळवा माणूस या पिसाळलेल्या स्वार्थाने…’, IPS विश्वास नांगरे पाटील हळहळले

| Updated on: Aug 05, 2023 | 8:23 PM

नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयावर अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकारी IPS विश्वास नांगरे पाटील यांनीदेखील दु:ख व्यक्त केलंय.

हा हळवा माणूस या पिसाळलेल्या स्वार्थाने..., IPS विश्वास नांगरे पाटील हळहळले
Follow us on

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर काल कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथील जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयावर अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकारी IPS विश्वास नांगरे पाटील यांनीदेखील दु:ख व्यक्त केलंय. त्यांनी फेसबुकवर व्यक्त होत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या लग्नाची धावपळ त्याचा जीव तोडीत असेल म्हणून मीही खोदून विचारले नाही. आता मात्र मन खातंय का विचारलं नाही म्हणून?”, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत. “हा हळवा माणूस या पिसाळलेल्या स्वार्थाने आणि अर्थाने गुरफटलेल्या दुनियेत हारला आणि वैतागून, कंटाळून आणि संतापून न सांगता निघून गेला”, असंही ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांची फेसबूक पोस्ट जशीच्या तशी

नितीन चंद्रकांत देसाई! हा पहाडासारखा दिसणारा, वृक्षासारखा ओतप्रोत भरलेला आणि जीवनाच्या अनेक पैलूंना आणि नियतीच्या अनेक रूपांना आपल्या प्रतिभेने आकृतिबंध करणारा अवलिया, अशी चटका लावणारी एक्सिट घेतोच कशी?

अनेक सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात नितीन भाऊ भेटायचा. मोकळा, रांगडा, दमदार आणि प्रेमळ गडी! भला मोठा गोतावळा, मित्रपरिवार आणि व्याप असताना हे कुठलं रितेपण अचानक त्याला गिळून गेलं, कळलंच नाही.

पोरगीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला माझ्या कार्यालयात आला, त्यावेळी फक्त आग्रह, प्रेम आणि जिव्हाळाच त्याच्या लांब पांढऱ्या झालेल्या दाढीतील थोड्याशा ओढवलेल्या चेहऱ्यातून ओघळत होता. पण त्याच्या जरा जास्तच खोल गेलेल्या डोळ्यांत वेदना आणि काळजी अधूनमधून डोकावतेय, असा उगाचच मला भास झाला. तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या लग्नाची धावपळ त्याचा जीव तोडीत असेल म्हणून मीही खोदून विचारले नाही. आता मात्र मन खातंय का विचारलं नाही म्हणून?

सिनेमातलं त्याचं योगदान जगाला माहीत आहे. पण मला जवळून पाहता आलं त्याचं अचूक नियोजन. ज्यावेळी मोदी साहेबांच्या 2014 च्या प्रचंड मोठ्या सभेचे नेटकं आणि देखणं स्टेज त्यांनी बनवलं! आमच्या सुरक्षेच्या सूचना आणि त्याची कलात्मकता याची सुलभ सांगड घातली गेली.

कोल्हापूरला आयजी असताना त्याने नवरात्रीच्या वेळी उभा केलेला देवीच्या नऊ रूपांचा अप्रतिम देखणा सेट त्याच्यासोबत पाहण्याची संधी मिळाली. कोल्हापूरकरांनी या अवलियाचा कौतुक सोहळा आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार कोल्हापूरकरांच्या वतीनं देण्याचं सौभाग्य मला मिळालं. पण सत्काराला उत्तर देताना त्याने त्याचा मुंबईच्या चाळीपासूनचा जीवनप्रवास उलगडला. आणि बापाच्या आठवणी सांगताना ढसाढसा रडला!

हा हळवा माणूस या पिसाळलेल्या स्वार्थाने आणि अर्थाने गुरफटलेल्या दुनियेत हारला आणि वैतागून, कंटाळून आणि संतापून न सांगता निघून गेला राव! निदान या देवमाणसाला असेल जर काही स्वर्ग वगैरे तिथं थोडा निवांतपणा मिळेल एवढंच अंबाबाईला साकडं