‘आता माझ्या बायकोलाही फोडता का?’, ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Aug 26, 2023 | 11:54 PM

शिंदे गटाकडून एका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला फोन गेला. आमच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तुमच्या पत्नीचं नाव आहे, असं समोरच्या महिलेने फोनवर सांगितलं. मात्र, पदाधिकारी आणि त्यांची नगरसेविका असलेली पत्नी दोघेही ठाकरे गटात असल्याने फोनवर झालेला संवाद व्हायरल झालाय.

आता माझ्या बायकोलाही फोडता का?, ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow us on

जळगाव | 26 ऑगस्ट 2023 : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातून एरंडोल येथील उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांना एका महिलेचा कॉल गेला. या महिलेने दशरथ महाजन यांच्या पत्नीचे नाव श्रीकांत शिंदे यांच्या यादीत असल्याचे सांगितलं. यावरून दशरत महाजन यांनी संबंधित महिलेला चांगलेच खडेबोल सुनावले. या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. दरम्यान, दशरत महाजन आणि या महिलेच्या फोनवरील संभाषणाचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानतंर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत याबाबतची माहिती पोहोचली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वत: दशरथ महाजन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी संबंधित प्रकार जाणून घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांनी दशरथ महाजन यांच्या निष्ठेचं कौतुक केलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दहशत महाजन यांच्या पत्नी कल्पना महाजन यांच्याशीदेखील फोनवरून बातचीत केली. “तुम्ही दोघे जण माझ्यासोबत आहात ना?”, असा प्रश्नही यावेळी उद्धव ठाकरे यांनी कल्पना महाजन यांना विचारला. “मी 10 सप्टेंबरला जळगावला येत असून यावेळी तुम्हाला भेटेल”, असा शब्द यावेळी उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत दशरथ महाजन यांना दिला.