सिनेमासारखी ३ तास सभा चालवणारा आमदार, १० मिनिटे इंटर्वल… मात्र त्यांचं आज दु:खद निधन

| Updated on: Aug 22, 2023 | 10:56 PM

जनता दलाचे माजी आमदार साथी गुलाबराव वामनराव पाटील यांचे निधन झाले आहे. गुलाबराव पाटील हे जनता दल या पक्षाकडून अमळनेर तालुक्याचे ३ वेळेस आमदार होते. साथी गुलाबराव अशी त्यांची ओळख होती. अमळनेरचा आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनावर त्यांचा प्रचंड वचक होता.

सिनेमासारखी ३ तास सभा चालवणारा आमदार, १० मिनिटे इंटर्वल... मात्र त्यांचं आज दु:खद निधन
Follow us on

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे जनता दलाचे माजी आमदार, गुलाबराव वामनराव पाटील यांचे निधन झाले आहे. गुलाबराव पाटील हे जनता दल या पक्षाकडून अमळनेर तालुक्याचे ३ वेळेस आमदार होते. साथी गुलाबराव आणि शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा काढणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती. गुलाबराव पाटील यांची अंत्ययात्रा २३ ऑगस्ट बुधवारी, दुपारी २ वाजता अमळनेर तालुक्यातीलल दहिवद गावातून निघणार आहे.गुलाबराव पाटील यांचे पार्थिव अमळनेरच्या साने गुरुजी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी ७ ते ९ या वेळेत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

विरोधकाच्या घरी जेवायला

विधानसभेत पहिल्यांदाच राजदंड पळवल्याच्या घटनेनंतर त्यांच्या नावाची चर्चा होती. गुलाबराव पाटील यांनी अमळनेर तालुक्याचा शैक्षणिक विकास केला. साने गुरूजी यांच्या कर्मभूमीतील गुलाबराव पाटील हे साने गुरुजींच्या विचाराने भारावलेले होते. शत्रूच्या घरी जेवायला जाण्याची तयारी ठेवणारा हा विरोधक होता.

अंधश्रद्धेविरोधात लढा

मधुकराव चौधरी यांच्यावर खटला सुरु असताना, मुंबईत त्यांच्याच गाडीने कोर्टात पोहोचले, त्यांच्याच घरी जेवण केले, अंधश्रद्धेविरोधात मोठा लढा दिला, गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस १२ सप्टेंबर होता, त्याचं दिवशी त्यांनी तिथी न पाहाता, मुलांची लग्न, नातवांची लग्न १२ सप्टेंबर रोजी लावली. आहिराणीत विधानसभेत शपथ घेणारे गुलाबराव वामनराव पाटील हे पहिले आमदार होते.

तीन तासाच्या सभेत १० मिनिटांचा इंटर्वल

गुलाबराव पाटील यांची सभी एखाद्या चित्रपटासारखी ३ तास चालायची, विरोधकांवर विनोदी फैरी झाडून ते घायाळ करायचे, सभेला दीड तास झाल्यानंतर ते मध्ये चित्रपटाचा इंटर्वल होतो, तसा १० मिनिटांचा ब्रेक घ्यायचे, या दरम्यान गुलाबराव पाटील तपकीर लावत बसत असत. यानंतर मात्र त्यांची मुलूख मैदान तोफ फोन विरोधकांवर धडाडायची, त्यांची खानदेशची मुलूख मैदान तोफ आणि शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा काढणारा आमदार अशी ओळख होती.

राजकीय कारकीर्द

गुलाबराव वामराव पाटील यांनी १९७८ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या दाभाडे रामदास सुग्राम यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी १९८० साली जेपींच्या जनता पार्टीकडून निवडणूक लढवली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या संभाजी गोविंदराव चव्हाण यांचा पराभव केला, यानंतर त्यांचा अमृतराव पाटील यांच्याकडून पराभव झाला. मात्र गुलाबराव पाटील पुन्हा १९९० साली, काँग्रेसचे दाजिबा पर्बत पाटील यांचा पराभव करुन पुन्हा आमदार झाले.ते आधी लोकल बोर्डावर, यानंतर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.