मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 3 महिन्यात घेण्यात यावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी केली होती. मात्र, 3 महिने उलटून गेल्यानंतरही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याबाबत निर्णय घेतला नाही. ही सुनावणी घेण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर कधी निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले असतानाच याबाबत राहुल नार्वेकर यांनी एक मोठे विधान केले आहे.
उदयपुर येथे देशातील सर्व राज्यांच्या पिठासीन अधिकाऱ्याची एका विशेष परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या परिषदेचे अयोजन केले होते. देशातील ३१ राज्यांमधील पिठासीन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या परिषदेमध्ये प्रत्येक विधिमंडळात राजशिष्टाचाराची एक वेगळी शाखा निर्माण करण्यात यावी. तसेच, प्रत्येक विधिमंडळाला शासनाकडून निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली अशी माहिती त्यांनी दिली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुढची कार्यवाही करण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. विधिमंडळातील कामकाज सुरळीत कसे चालवावे यावर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. प्रत्येकाने आपल्या सूचना त्या बैठकीमध्ये दिल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी आपले विचार मांडले असे त्यांनी सांगितले.
सर्व भारतवासीयांना अभिमान वाटेल असे चांद्रयान 3 मिशन भारताने घेतलं आहे. देशवासियांना आणि सर्व शास्त्रज्ञांना मनापासून शुभेच्छा देतो. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताला एक आधुनिक विक्रम करण्याची संधी प्राप्त होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष अपात्रतेसंदर्भात असो किंवा अन्य महत्वाचे विषय असो त्यावर निर्णय घेताना ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. त्याचे मला पूर्ण भान आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक चर्चा करणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी कधी तर मी तुम्हाला आश्वासित करतो की यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.