बीड : बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केलाय. अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये पोहोचली आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केलाय. पण त्यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.
“संजय राऊत सभेसाठी येणार आहेत. त्यामुळे मी पाहणी करण्यासाठी गेले. मी फेसबुक लाईव्हने सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उभे असलेले जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव हे तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला कामाच्या सूचना देत होते. ते त्यांना ओरडत होते की, हे इकडं का टाकलं, तिकडे का टाकलं म्हणून”, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
“संबंधित व्यक्ती हा कामगार नव्हता. तर तो पदाधिकाऱ्याचा मित्र होता. तो म्हणाला की, तू मला सांगू नको. मी कामगार नाहीय. त्यांना हे माहिती नव्हतं की ते जिल्हाप्रमुख आहे. आप्पासाहेब जाधव म्हणाले, अरे मी जिल्हाप्रमुख आहे. तर तो म्हणाला, अरे असशील जिल्हाप्रमुख असं म्हणत वाईट शिवी दिली”, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
“आम्ही सगळे खाली उतरलो. भांडण सोडून आलो. उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर पोलीस ठाण्याला जात होता. पण आम्ही समजूत काढली. यावरुन आम्हाला एक खात्री पटली आहे की, शिंदे गट प्रचंड अस्वस्थ झालेला दिसतोय. प्रचंड अस्थितरता माजलेली दिसतेय. महाप्रबोधन यात्रा कशी बंद करता येईल, अडथळे कसे निर्माण करता येतील, यासाठी प्रयत्न सुरु आहे”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
“आमचा हा जिल्हाप्रमुख काठावर होता. तो अनेक दिवसांपासून शिंदे गटाच्याच वाटेवर होता. त्याला जाणीवपूर्वक पुढे करुन मला आणि प्रबोधनयात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. साहजिक आहे की, मला काही घडलं असतं तर जिल्हा प्रमुख तिथून सुखरुप गेले असते का?”, असा सवाल त्यांनी केला.
“एखादा जिल्हाप्रमुख महिलेवर हात उचलला, असं जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हा प्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाकडून अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय. पण महाप्रबोधन यात्रा दणक्यात होणार”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.