सातारा / 28 ऑगस्ट 2023 : उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून साताऱ्यात एका महिलेवर भरचौकात हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, तर दोन जण फरार झाले आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. देवदास रोहिदास नरळे आणि पिंटू ऊर्फ शांताराम रोहिदास नरळे अशी अटक आरोपींची नावं आहेत. तर संतोष गोपाळ नरळे आणि जनाप्पा विठ्ठल शिंदे हे दोघे पळून गेले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा जनावरांच्या चारा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे माण तालुक्यात जनावरांचा चारा हा जिल्ह्याबाहेरुन मागवला जात आहे. माण तालुक्यातील बहुतांश वाड्या वस्त्यांवर जनावरांसाठी हा चारा विकत दिला जात आहे. यामध्ये अनेक वादाच्या घटना देखील घडत आहेत.
असाच एक धक्कादायक प्रकार माण तालुक्यात घडला आहे. शनिवारी पानवन येथील एका महिलेने जनावरांच्या चाऱ्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून या गावातील एका महिलेला चार जणांनी लाथा बुक्क्यांनी आणि उसाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. देवदास रोहिदास नरळे पिंटू उर्फ शांताराम रोहिदास नरळे या दोघांना महिलेला मारहाण प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून, यामधील संतोष गोपाळ नरळे आणि जनाप्पा विठ्ठल शिंदे हे दोघे फरार झाले आहेत.
या मारहाणीचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला. याप्रकरणी देवदास तुपे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संशयित चार आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट विनयभंग आणि बेदम मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत. मात्र या घडलेल्या प्रकारामुळे अशा प्रवृत्ती विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.