Pune News : बँकेत बनावट सहीने कोटींचे कर्ज, बँक अधिकारी अडकले, कसा घडला प्रकार

| Updated on: Aug 27, 2023 | 10:55 AM

Pune Crime News : पुणे शहरात बनावट सही करुन मोठे कर्ज उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कर्ज घेणारेच नाही तर बँक अधिकारीसुद्धा अडकले आहेत.

Pune News : बँकेत बनावट सहीने कोटींचे कर्ज, बँक अधिकारी अडकले, कसा घडला प्रकार
Follow us on

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : बँकांच्या फसवणुकीचे प्रकार राज्यात अनेकवेळा उघड होतात. परंतु बनावट सही करुन कर्ज घेतल्याचे वेगळेच प्रकरण पुणे शहरात उघड झाले आहे. कोट्यवधी रुपयांचे हे कर्ज बँकेने बनावट सहीने दिले. 2011 पासून घडलेल्या या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात बनावट कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसह रुपी बँक, एचडीएफसी बँकेमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. द धरमपेठ महिला मल्टीस्टेट सोसायटीत हा प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण

हरेश मिस्त्री आणि किरण मिस्त्री यांच्या नावाचा आणि त्यांच्या बनावट सहीचा वापर करून 3 कोटींचे कर्ज काढल्याचे हे प्रकरण आहे. आरोपी राजेंद्रप्रसाद जैन, उषा जैन, शीतलप्रसाद, विशाखा जैन यांनी हरेश मिस्त्री यांच्या सहीचा वापर करुन तीन कोटी रुपयांचे कर्ज काढले. या कर्जावर राहुल जैन, प्रेमचंद्र बोरा, नीरज जैन यांच्या जामीनदार म्हणून सह्या आहेत. हरेश मिस्त्री त्यांची पत्नी किरण मिस्त्री यांचे एम जी रोड येथे अंबा कॉम्प्लेक्स मधील कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांनी राजेंद्रप्रसाद जैन वापरण्यास दिले होते.

अशी मिळवली कागदपत्रे

मिस्त्री यांच्यावर रुपी बँकेचे कर्ज होते. त्यांना जप्तीची नोटीस आली. त्यानंतर त्यांनी 12 लाख 50 हजार रुपयांची परतफेड केली. त्यावेळी त्या कार्यालयाच्या मिळकतीचे मूळ कागदपत्रे त्यांना मिळाली नाही. बँकेने ही कागदपत्रे राजेंद्रप्रसाद जैन यांना दिली. त्या आधारे राजेंद्रप्रसाद जैन नाना पेठेत असलेल्या एचडीएफसी बँकेत मिस्त्री यांच्या नावाने बँक खाते सुरु केले. मग या बँक खात्याचा वापर द धरमपेठ महिला मल्टीस्टेट सोसायटीकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात वापरले. ही घटना 2011 पासून आजपर्यंतच्या काळात घडली आहे.

हे सुद्धा वाचा

बँक अधिकारी अडकले

बँक अधिकाऱ्यांनी खाते उघडताना आणि बँकेचे कर्ज देताना कागदपत्रांची तपासणी केली नाही. या प्रकरणात एचडीएफसी, रुपी बँक आणि द धरमपेठ महिला मल्टीस्टेट सोसायटीचे अधिकारी अडकले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.