मुंबई / 23 ऑगस्ट 2023 : ताडदेवमधील जेष्ठ नागरिकांवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता गावदेवी परिसरात वृद्ध महिलेवर हल्ला झाला आहे. शमीना इब्राहिम नाकारा असे 68 वर्षीय महिलेचे नाव आहे. गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवालिया टँक येथे सकिना पॅलेस इमातीत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश पानवाल असे महिलेचे नाव आहे. आरोपी महेश महिलेच्या घरी जेवणाचा डब्बा देण्याचे काम करतो. पीडित महिला आपल्या पतीसोबत सकिना पॅलेसच्या तळमजल्यावर राहते. या घटनेमुळे जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शमीना नाकारा यांचे पती शेअर ब्रोकर म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे पती कामासाठी गेले होते. तर नाकारा या घरी एकट्या होत्या. नाकारा या महेशकडून रोज टिफिन घेतात. नेहमीप्रमाणे महेश सोमवारी दुपारी टिफिन द्यायला गेला. त्याने दरवाजाची बेल वाजवली. नाकारा यांनी दरवाजा उघडताच महेश आत घुसला. त्याने नाकारा यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मात्र नाकारा यांनी पैसे देण्यास नकार दिला.
पैसे देण्यास नकार दिल्याने महेशने खिशातील चाकू काढला आणि नाकारा यांच्यावर हल्ला केला. मात्र नाकारा यांनी हिंमत दाखवत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. याचवेळी घरातील आरडाओरडा ऐकून इमारतीच्या वाचमनला नाकारा यांच्या घरी काहीतरी अनुचित घडत असल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला. नियंत्रण कक्षातून गावदेवी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ सकिना पॅलेसमध्ये धाव घेत आरोपीला अटक केली.
आरोपी महेशला त्याच्या मुलाला अकरावीत प्रवेश घ्यायचा होता. यासाठी त्याला पैशांची गरज होती. गेल्या सात वर्षांपासून तो नाकरा यांच्या घरी टिफिन पोहोचवत होता. नाकराने पैशांसाठी अनेकांकडे मदत मागितली होती, मात्र कुणीही त्याला मदत केली नाही. यानंतर त्याने नाकरा यांच्याकडे मदत मागितली, मात्र त्यांनीही दिली नाही. यामुळे संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला.