मुंबई / 24 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सदर तरुणाला दादर येथून अटक केली आहे. कैलास कापडी असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी कैलास हा सार्थक कपाडी नावाच्या ट्विटवर हॅन्डलवरून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना ट्रॉल करत होता. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने कापडीला अटक केली आहे. तरुणाने हे कृत्य का केले याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
दादरमधील वाडिया रोडवर कैलास कापडी हा तरुण राहतो. सार्थक कापडी नावाच्या ट्विटर हँडलवरुन त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिंदे गटातल्या अनेक नेत्यांवर तसेच महिलांवर तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत त्याला अटक केली आहे.
आक्षेपार्ह पोस्टनंतर आरोपी कापडीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्या आयपी अॅड्रेसवरुन त्याचं लोकेशन तपासलं. त्यानुसार त्याला ट्रेस करुन शोध घेतला आणि अटक केली आहे. हल्ली सोशल मीडियाचा गैरवापर करत नेते मंडळी, सेसिब्रेटी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्टक करण्याच्या घटना वाढल्या आहेत.