डोंबिवली / 24 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत चोरीच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. विशेषतः महिला आणि जेष्ठ नागरिकांना अधिक टार्गेट केले जाते. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. भररस्त्यात वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचल्याची घटना घडली. मात्र मंगळसूत्र खेचताना पळत असतानाच आरोपीला नागरिकांनी पकडले आणि बेदम चोपले. यानंतर आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चोरट्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ऑनलाईन गेममुळे कर्जबाजारी झाल्याने कर्ज फेडण्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग निवडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. नितीन ठाकरे असे आरोपीचे नाव आहे.
नितीन ठाकरे याला ऑनलाईन रमी सर्कलवर गेम खेळण्याचं व्यसन होतं. या गेममुळे नितीन कर्जबाजारी झाला होता. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो होता. यामुळे चोरीचा मार्ग निवडला. पण चोरीच्या प्रयत्नामुळे तो थेट तुरुंगातच गेला. ऑनलाईन गेमपायी तरुणाईला कशी चुकीच्या मार्गाला लागतेय, याचं उदाहरण आहे.
डोंबिवली पूर्वेला राहणाऱ्या सुवर्णा नेवगी या 70 वर्षीय महिला खरेदीनिमित्त डोंबिवली पश्चिमेला गेल्या होत्या. खरेदी करुन त्या डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यान परिसरात असलेल्या रेल्वे पुलाच्या जीन्यातून डोंबिवली पूर्वेकडील येत होत्या.याच दरम्यान एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्यांनी यांच्या गळ्यातील महागडे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. यावेळी तेथे असलेल्या एका तरुणाने हे पाहिले.
तरुणाने चोरट्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. यानंतर चोरट्याला विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याचे नाव नितीन ठाकरे असून, तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच त्याला रमी सर्कलवर गेम खेळण्याची सवय असून, या गेमसाठी लोकांकडून कर्ज घेतले. मात्र गेममध्ये तो हरल्याने कर्जबाजारी झाला. लोकांचे कर्ज फेडायचे कसे या चिंतेने त्याने चोरीचा मार्ग निवडला. मात्र पहिलीच चोरी करताना तो पकडला गेला.