अकोला / 11 ऑगस्ट 2023 : रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारे संतापजनक कृत्य अकोल्यात घडले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेती आणि घर नावावर करत नव्हती, म्हणून दोन मुलांनी पित्याच्या मदतीने आईला विष पाजल्याची घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात दोन्ही मुलं, सुना आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथे ही धक्कादाक घडना घडली. वंदना भिमराव गवई असे पीडित महिलेचे नाव आहे.
अकोला जिल्हातल्या बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथे वंदना गवई या त्यांच्या नवरा, दोन मुलं आणि सुना यांच्यासोबत राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून वंदना यांचाय कुटुंबीयांसोबत शेती आणि घराच्या जागेवरून वाद सुरू होता. वंदना गवई यांच्याकडे 5 एकर शेती आणि घर आहे. हे दोन्ही वंदना यांच्या नावावर असल्याने ते आपल्या नावावर करून देण्यासाठी वाद सुरु होता.
अखेर हा वाद आता विकोपाला गेला आणि स्वतःच्या दोन मुलांनीच आपल्या आईला आणि नवऱ्याने त्याच्या बायकोला विष वाजून मारण्याचा प्रयत्न केला. या घटेनमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. सुदैवाने वंदना गवई या बचावल्या असून जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. शेती आणि घराच्या छोट्याशा तुकड्यासाठी पोटच्या मुलांनी केले कृत्य पाहून संताप अनावर होत आहे.