मुंबई : दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) साजरे केले जाते. यंदा 30 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण साजरा होणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधते. भावांच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधली जाते, त्यामागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारणे आहेत. यासोबतच शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. बहिणीने भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावरच राखी बांधावी. यामागचे कारण आपण जाणून घेऊया.
शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्त्वाची आहे. म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे उजव्या हाताने केली जातात. शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते. उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो, म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात. मंदिरात पूजेच्या वेळी जो मौली धागा बांधला जातो तो देखील फक्त उजव्या हाताला बांधला जातो. शास्त्रानुसार राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते.
राखी फक्त मनगटावर का बांधली जाते, याचा विचार तुम्ही केला आहे का? वास्तविक, यामागे आध्यात्मिक, शास्त्रीय कारणे आहेत. अध्यात्मिक कारणांबद्दल सांगायचे तर असे मानले जाते की मनगटावर राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
आयुर्वेदानुसार, मनगटावर राखी बांधल्याने वात, पित्त, कफ संतुलित होतात, ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मानावर सकारात्मक परिणाम होतो. राखी हे संरक्षणाच्या बंधनाचे प्रतिनिधित्व करत असल्याने, एखाद्याला स्वतःमध्ये सामर्थ्याचा संवाद जाणवतो. या वाढत्या आत्मविश्वासाबरोबर सकारात्मक विचारही वाढतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)