अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरले? अजित पवार देणार माहिती
ajit pawar amit shah : राज्यात मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झाला. तिसऱ्या विस्तारापूर्वी तीन पक्षांत एकमत होत नाही. यामुळे दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अजित पवार यांचीही बैठक झाली.
योगेश बोरसे, पुणे : राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. यानंतर सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसोबत आला. यामुळे शिवसेना, भाजपसोबत राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. परंतु त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. तीन पक्षांमध्ये खातेवाटपासंदर्भात एकमत होत नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनाही खाती अजून मिळाली नाही. अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, याची माहिती अजित पवार देणार आहेत.
अजित पवार यांनी बोलवली बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अजित पवार सर्व माहिती देणार आहे. दिल्लीतील बैठकीत काय चर्चा झाली यावर अजित पवार वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.
खातेवाटपावर काय झाला निर्णय
राज्य सरकारमधील खातेवाटपात कोणतीही अडचण येणार नाही. कालच्या दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खातेवाटप संदर्भात मार्ग निघाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही ९ मराठीला दिली. अजित पवार यांच्यांकडे अर्थ खाते देण्यास शिंदे गटातील मंत्र्यांचा विरोध आहे. त्यासंदर्भात शिंदे गट आक्रमक आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांचा शपथविधी होऊ दहा-बारा दिवस झाले तरी खातेवाटप जाहीर झालेले नाही. परंतु आता त्यावर तोडगा निघाला आहे.
प्रफुल्ल पटेल चर्चेला होते उपस्थित
दिल्लीत अमित शाह अन् अजित पवार यांची बैठक झाली त्यावेळी प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित होते. शपथविधीपूर्वी अर्थ अन् जलसंपदा ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. परंतु शपथविधीनंतर ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जात नसल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता.