सस्पेन्स वाढला! हसन मुश्रीफ यांना धक्का की दिलासा? कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून त्यांची सातत्याने चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याच याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे सध्या ईडी (ED) कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणं टाळलं होतं. त्याऐवजी त्यांनी कोर्टाची पायरी चढत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी पावलं उचलली. याप्रकरणी कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला. त्यानंतर हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं गेले. या सगळ्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
हसन मुश्रीफ यांची गेल्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल तीन ते चार वेळा चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफांनी स्वत: गेल्या आठवड्यात सात तासांच्या चौकशीनंतर आपण ईडी कार्यालयात चौथ्यांदा आल्याची माहिती दिली होती. याशिवाय आपण ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केले. ईडी अधिकाऱ्यांचा एकही प्रश्न आपण टाळला नसल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. या सगळ्या घडामोडींदरम्यान हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतलीय. याच प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
कोर्टाचा नेमका निकाल काय?
हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर कोर्टात आज युक्तिवाद झाला. या प्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी विशेष पीएएमएलए कोर्टात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण कोर्टाने या प्रकरणाचा तातडीने निकाल जाहीर केला नाही. कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. तसेच येत्या 5 एप्रिलला याबाबतचा निकाल देणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.
विशेष पीएएमएलए कोर्टाकडून निकाल जाहीर करण्यात आला नसल्याने हसन मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण मिळणार आहे की, अटक होईल याबाबतची साशंकता वाढली आहे. कोर्ट काय निकाल देईल यावर मुश्रीफांचं पुढील भवतव्य अवलंबून राहणार आहे. मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याच प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. मध्यंतरी ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत धाड टाकल्याची माहिती समोर आलेली. फक्त एवढंच नाही तर बँकेच्या स्टाफला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली.