Shiv Sena : विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेदपद शिवसेनेला मिळणार?; सचिन अहिर म्हणतात, दावा आमचाच

| Updated on: Jul 09, 2022 | 8:00 AM

Shiv Sena : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी कितीही दावे करू द्या, धनुष्यबाण चिन्हं हे कायम शिवसेनेसोबत राहील.

Shiv Sena : विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेदपद शिवसेनेला मिळणार?; सचिन अहिर म्हणतात, दावा आमचाच
विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेदपद शिवसेनेला मिळणार?; सचिन अहिर म्हणतात, दावा आमचाच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडानंतर संख्याबळा अभावी शिवसेनेला (shivsena) विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळू शकलं नाही. राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले असून त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे. विधानसभापाठोपाठ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्या हातून जाण्याची चर्चा होती. मात्र, शिवसेनेने या पदावर दावा केला आहे. आमच्याकडे विधान परिषदेत सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेलाच मिळायला हवे, असं शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना कुणाची वर्णी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधान परिषदेत आता आमचे 13 आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षे ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर आम्ही या पदावर दावा करू, असं सचिन अहिर यांनी सांगितलं. मात्र, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार यावर त्यांनी बोलणं टाळलं.

हे सुद्धा वाचा

आनंदाबरोबरच दु:ख आहे

आज जरी मी शपथ घेतली असली तरी सुद्धा मला आनंदाबरोबर दुःख सुद्धा आहे. कारण की ज्या वेळेस विधानपरिषद निवडणुकीदरम्यान जी लोकं आमच्याबरोबर होती ती आता वेगळ्या प्रवाहात गेलेली आहेत.
त्याचं दुःख होत आहे. पण तरीसुद्धा ज्या घडामोडी घडल्या त्याला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे सामोरे जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. वॉर्ड रचनेचा मुद्दा आता भाजपा उपस्थित करत आहे. पण मला वाटतं की अशा पद्धतीने एक विसंगती निर्माण करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा डाव तर भाजपचा नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो, असंही ते म्हणाले.

धनुष्यबाण शिवसेनेसोबतच राहील

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी कितीही दावे करू द्या, धनुष्यबाण चिन्हं हे कायम शिवसेनेसोबत राहील. शिवसेनेबाबत एवढीच आपुलकी असती तर राजीनामा देऊन ते मैदानात आले असते, असा टोला लगावतानाच आता पक्ष नव्याने सुरुवात करत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मानसिकता तयार करून कामाला लागलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

तुम्ही भ्रमात राहू नका

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काल कुणीही धनुष्यबाण हिरावून घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. कायद्याच्या दृष्टीने धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण नुसत धनुष्य बाण चिन्ह असलेल्या माणसाचा लोक मतदानात विचार करता. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही. नगरसेवक गेले पण महापालिका अस्तित्वात नाही. गेले ते त्यांचे समर्थक. काल शिवसेना महिला जिल्हा प्रमुख त्यांच्या डोळ्यात अश्रु होते. शिवसेनेने आजवर साध्या माणसाला मोठे केले ह्याचा अभिमान. यांच्यामुळे ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. साधी माणसं जोवर शिवसेने सोबत तोवर धोका नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेवटी रस्त्यावरचा पक्षाला मते देतात. कधीकाळी आमचा पण एकच आमदार होता. आमदार जाऊ शकतात, पक्ष नाही. तुम्ही भ्रमात जाऊ नका. विधीमंडळ पक्ष वेगळा. धनुष्यबाण आपल्याकडेच राहील. जे सोबत राहिलेत त्यांचे जाहीर कौतुक. काही झाले तरी ते हटले नाहीत. अजूनही देशात असत्यमेव जयते नसून सत्यमेव जयते आहे, असंही ते म्हणाले.