पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचा ताबा आहे. या निवडणुकीत आमदार मोहित यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. या निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले आहेत. त्यांना काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेचीही साथ मिळाली आहे. येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवसच मिळणार असल्याने दोन्ही पॅनलकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. बाजार समितीत झालेल्या कारभार उघड करण्यासाठी आणि बाजार समिती वाचविण्याची आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे.
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. 18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, खेड तालुक्यावर आमदार मोहिते यांचे 2004 पासून कायम वर्चस्व राहिले आहे. मोहितेंविरुद्ध त्यांचे सगळे विरोधक एकत्र येऊनही ते विधानसभेसह जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहेत. मात्र, 2014 चा विधानसभेचा अपवाद वगळता त्यांना त्यात यश आलेले नाही.
2014 मध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षीय एकवटले आणि मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सुरेश गोरे यांनी पराभव केला. यावेळी, मात्र परिवर्तन होणार असल्याचा दावा आमदार मोहितेंच्या विरोधकांनी केला आहे. परिवर्तनाची नांदी सुरु झाल्याचा दावा त्यांच्याविरुद्धच्या काँग्रेस, ठाकरे गट, शिवसेना आणि भाजपच्या भीमाशंकर शेतकरी परिवर्तन पॅनेल केला आहे. तर सर्व उमेदवारांनी हातात भंडारा देवून एकनिष्टतेची शपथ ही दिली आहे.
खेड तालुक्यात सहकारी साखर कारखाने नाही त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकच संस्था मोठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार व्हावा, यासाठी राजकीय पक्षाचा विचार न करता सर्व पक्षीय एकत्र आले आहेत, यातून एकमेकांचे विचार बाजूला ठेवून सर्व एकत्र आले आहेत. तर महाविकास आघाडीने ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेतले नाही म्हणून आम्ही सर्वांना एकत्र घेवून ही निवडणूक लढवीत असल्याचे भाजपाकडून बोलल जात आहे.
यापूर्वीही आपले सारे विरोधक झाडून एकत्र आले होते. त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता फक्त या विरोधकांचा पक्ष बदलला आहे. पक्षश्रेष्ठींकडून एकत्र येवून काम करण्याच्या सूचना होत्या. मात्र विचारण्याची जुळणी झाली नाही आणि त्यांना थांबण्यास रस नसल्याने ते ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेस विरोधी पक्षांसोबत गेले. मात्र त्यांची एकी राहणार नसून यावेळी पुन्हा बाजार समितीत आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा आमदार दिलीप मोहिते यांनी केला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांच्याप्रमाणे आमदार मोहिते हे बिनविरोध निवडून आले. त्यावेळी मात्र हे आता एकवटलेले विरोधक का एकत्र आले नव्हते? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आमदार मोहितेंच्या भीमाशंकर सहकारी पॅनेलमध्ये जुन्यांबरोबर नव्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. गतवेळी त्यांच्या विरोधकांना बाजार समितीत चार जागा मिळाल्या होत्या. यामुळे आता सर्व पक्षीय एकवटले असल्याने याचा राष्ट्रवादी काँगेसला फटका बसणार का? हे पाहावे लागणार आहे