मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातली आता एक सर्वात मोठी बातमी आलेली आहे. एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Shivsena MLA Sanjay Shirsat) हे आता उद्धव ठाकरेंकडे परतीच्या वाटेवरती आहेत का? असा सवाल उपस्थित करणारं संजय शिरसाट यांचं एक ट्विट आलेलं आहे. या ट्विटने राज्याचं राजकारण पुन्हा हादरवून सोडलेलं आहे. संजय शिरसाठ यांनी आपल्या ट्विट मधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केलेला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं विधानसभेतलं एक भाषण ही त्यांनी त्या ट्विटला जोडलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे दिलेलं वचन आम्ही पाळतोच आणि दिलेला शब्द हा खरा करून दाखवतोच, असे म्हणताना दिसत आहेत. तर संजय शिरसाट यांची अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागलेली नाहीये. त्यामुळे संजय शिरसाठ यांना मंत्रिपदाचे वचन मिळालं होतं का? आणि ते वचन पूर्ण झालं नाही, म्हणून शिरसाठ यांचे हे संकेत आहेत का? असा सवाल उपस्थित करणार हे ट्विट आहे. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं.
या ट्विटबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, मी जे ट्विट केलं आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठीमागे एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली होती. आजही माझं असं मत आहे जर तुम्ही कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावत असाल त्यावेळी मग तुम्ही कुटुंबाचं असलेलं मत कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे होतं. तुम्ही तुमच्या मतावर नाही तर कुटुंबाच्या मताबद्दल विचार केला पाहिजे होता. कुटुंबाच्या मताला तुम्ही मान दिला पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ होता. मी ट्विट केलं याचा अर्थ कुटुंबप्रमुख ते राहिले असते, आम्ही नेहमीच त्यांना कुटुंब प्रमुख मानत आलो, परंतु त्यांनी आमचं त्या वेळेला ऐकलं नाही आणि आजची जी अवस्था झाली त्याबद्दल आम्हालाही खेद वाटतोय, असे शिरसाट म्हणाले.
मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी हे ट्विट केलेलं नाही. मंत्रीपदासाठी मी भुकेलेलो लोक नाही. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये मी प्रत्येक वेळेला माझं स्पष्ट मत मांडलं आहे. मला योग्य वाटतं ते मी बोलतो आणि बोलताना मी त्यांनी आपला विचार थोडा बदलावा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ नये, हीच भूमिका मी पहिल्यापासून मांडत आलोय आणि आजही मी त्या भूमिकेपासून मागे फिरणार नाही, मला मंत्रिपद मिळालं, नाही मिळाला हा विचार माझ्या डोक्यात कधी येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
एकनाथ शिंदे हे सुद्धा कायम त्यांची साथ सोडा हीच भूमिका मांडत आले आहेत, आपण शिवसेना-भाजप बरोबर युती करून निवडून आलेलो आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या सोबत बसू शकत नाही, आमदार नाराज आहेत. आमदारांची काम होत नाहीत, हीच आमची भूमिका होती आणि कुटुंबप्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यासमोर हेच मांडत होतो, त्यात काही आम्ही चूक करत नव्हतो ना? अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि हे ट्विट डिलीट केलं.