मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना तपासे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ज्या दिवशी या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्या दिवसापासून या सरकारची उलटी गिनती सुरू होईल, असं महेश तपासे म्हणाले आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तपासेंनीही त्यावर राष्ट्रवादीची भूमिका मांडली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार हे गेली दहा महिने आम्ही ऐकतो आहोत. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे चाळीस आमदार मंत्रिमंडळाचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसले आहे. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार हा मोठा प्रश्न आहे. अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू की रवी राणा की अन्य कोणाची लागणार ही पण एक गोष्ट आहे. या चाळीस आमदारांना संतुष्ट करता आलं नाही तर हे 40 आमदार काय भूमिका घेणार हा देखील मोठा प्रश्न आहे, असं तपासे म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अशी अपेक्षा आहे की, बहुतेक कॅबिनेट मंत्री आणि राज्य मंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीकडे असले पाहिजे. त्यामुळे दोन्ही पक्षात संघर्षाचं वातावरण आहे, असं म्हणत त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय.
नवीन संसद भवनाचं उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते झालं पाहिजे. अशी भूमिका शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष तसंच इतर विरोधी पक्षांची आहे. मात्र तसं न होता नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कुठेतरी राष्ट्रपती कार्यालयाच्या अवमान महत्व कमी करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व खासदारांनी या कार्यक्रमाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात सगळेच गैरहजर राहणार आहेत, असं ते म्हणालेत.
भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा पराभव करणं हे एकमेव उद्दिष्ट महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांचं आहे. त्यांच्या या मतामुळे जागावाटपाचा निर्णय सोप्या पद्धतीने होणार आहे, असं ते म्हणालेत.