मोठा दिलासा ! मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना त्याच परिसरात घरे? उदय सामंत यांची घोषणा काय?; आदित्य ठाकरे यांनाही डिवचले
महावितरणमध्ये घोटाळा झाल्याचे खरे आहे. साडे तीन कोटींचा हा भ्रष्टाचार आहे. लोकयुक्तांच्या मार्फत याची चौकशीचे आदेश दिले आहेत. एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई | 19 जुलै 2023 : मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना त्याच परिसरात घरे देण्याचा प्रयत्न करू, अशी महत्त्वाची आणि मोठी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. वरळीतील गणपतराव कदम मार्ग, केशवराव खाडे मार्ग, डॉ. ई मोजेस मार्गावरील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनिवासी गाळेधारकांना आधी घरे दिली जाईल. मग कामाला सुरूवात केली जाणार असल्याचंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
प्रकल्पबाधितांच्या घरांच्या विषयावर आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सह्यांची मोहीम राबवली होती. पालिकेकडून आलेल्या नोटीसांमुळे परिसरातील शेकडो नागरिकांमध्ये होते भीतीचे वातावरण आहे, अशी माहिती देताना मंत्री उदय सामंताची आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला. या प्रश्नाबाबत एक समिती स्थापन केली जाईल. प्रश्न वरळीचा असून या समितीत वरळीतला कोण एक आमदार असणार हे ठरवून सांगा. कारण वरळीत सध्या तीन आमदार आहेत, असा चिमटा काढला. त्यावर मंत्री शंभूराजेंनीही आमदार वरळीत राहणारा असावा असे म्हणत आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी करा
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली, मिरज- कुपवाडा महापालिकेकडे सरकारचं लक्ष वेधलं. महापालिकेने पथदिवे तसेच सार्वजनिक वीज यात भ्रष्टाचार केला आहे. मात्र यात फक्त महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवले. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी का होत नाही? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. त्याला उदय सामंत यांनी उत्तर दिलं.
महावितरणमध्ये घोटाळा झाल्याचे खरे आहे. साडे तीन कोटींचा हा भ्रष्टाचार आहे. लोकयुक्तांच्या मार्फत याची चौकशीचे आदेश दिले आहेत. एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत. पुढच्या पंधरा दिवसात एसआयटी नेमली जाईल. काही अधिकाऱ्यांची चौकशीही झाली. यात ज्ञानेश्वर पाटील यांना अटक केली असून ते जेलमध्ये आहेत. एसआयटी नेमण्याबाबतचा प्रस्ताव हा पोलिस महासंचालकांकडे आहे. पंधरा दिवसात एसआयटी नेमली जाईल, असं आश्वासन पडळकर यांनी दिलं.
सरकारकडे उत्तरच नाही
बियाणेबाबत सरकारला प्रश्न विचारला त्यांना उत्तर देता आले नाही. बोगस बियाणे असल्याचे नंतर कळते आहे. खतांच्या किमतींबाबतही उत्तर आलं नाही. खताच्या किमती स्थिर नाहीत. नफेखोरी करण्याचं प्रयत्न झाला आहे. कर्जमाफीसुद्धा राज्यात झाली नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे आणि खरीप हंगामावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, त्यावरही उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला आहे, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.