इंदापूर : (Shahaji Patil) शहाजी बापू हे सांगोल्याचे आमदार तर आहेतच पण त्यांच्या त्या सुप्रसिद्ध डायलॉग नंतर ते सेलिब्रेटीही झाले आहेत. काल औरंगाबादमध्ये तर आज ते (Indapur) इंदापूरात माजी खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या 16 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दाखल झाले होते. यावेळी त्यांनी अनेक किस्से इंदापूरकरांसमोर सांगितले. या दरम्यान चर्चेत राहिला तो बावडा गावातील किस्सा. बावडा गावात शहाजी बापूंनी बैलापुढं नृत्य करण्यासाठी थेट (Usha Chavhan) उषा चव्हाण यांना आणले होते. त्यावेळी बापू कडे मेव्याची पिशवी होती, उषा चव्हाण यांनी गाण्यावर ठेका धरताच बापू मेवा काढून उषा चव्हाण वर टाकायचे. एवढेच नाहीतर पुढे जाऊन त्यांनी बावड्यात आमची जोड खूप गाजली होती असेही म्हणाले.
बावडा गावात उषा चव्हाण यांना बैल मिरवणूकीसाठी आणले ही गोष्ट स्वर्गीय शंकराव पाटील भाऊंना कळाली. इथपर्यंत ठीक होते. पण बापूंनी उषा चव्हाण यांच्यावर मेवा टाकले हे समजताच त्यांनी बापूंचे कान पकडले होते. शिवाय येथून पुढे अशा गोष्टी करू नको असे समजावून सांगितले.
पुढील निवडणुकीत खासदार किंवा आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीत किंवा मुंबईत पाठवा असे अवाहन शहाजी बापूंनी इंदापूरकरांना केले. एवढेच नाही तर तुम्ही माझा एवढा शब्द पाळा, मी तुम्हाला स्वतः कीर्तन करून दाखवतो असे ते म्हणाले आहेत. कीर्तन मधील सर्व ॲक्शन व कीर्तन ही मला येते, मी अगोदर अनेक वेळा कीर्तन केले आहेत. त्यावेळी कीर्तनासाठी पैसेही मी घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांचा गत निवडणूकीत 10 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आगामी काळात तुम्ही त्यांना निवडून द्या असे आवाहन बापूंनी तर केलेच पण जी 10 हजार मते कमी पडली होती, ती आपल्या भाषणातून त्यांना मिळवून देणार असल्याचेही बापू म्हणाले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे चुलते व माजी खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बापूंनी मैदान मारले होते.