मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डिनर डिप्लोमसी, आमदारांना देणार फाइव्ह स्टार खाना; कारण काय?
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. राज्यातील सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटाला मिळणारी मंत्रिपदं अजितदादाच्या गटाला गेली. परिणामी शिंदे गटातील मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे.
मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : राज्याचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आमदारांना भोजनाचं आमंत्रण दिलं आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे भोजन देण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगली आहे. डिनरच्या माध्यमातून आमदारांशी संवाद साधण्याचा शिंदे यांचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. ताज लँडझेंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना डिनर ठेवलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी ही डिनर डिप्लोमसी होणार आहे. शिंदे यांच्या या डिनरला भाजप आणि अजितदादा गटाचे आमदारही उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आमदारांशी संवाद साधणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि त्यांच्या समस्या ऐकून घेऊन मार्गी लावणं हा त्यामागचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या डिनर डिप्लोमसीचा हेतू किती साध्य होतं, हे पाहावं लागणार आहे.
विस्ताराच्या पार्श्वभूमीवर
विधानसभेच्या अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अधिवेशनाचं सूप वाजलं तरी अजूनही विस्तार झालेला नाही. या विस्तारात आपल्याला संधी मिळेल अशी अनेकांना आशा आहे. त्यासाठी अनेक आमदारांनी सेटिंग लावण्यासही सुरुवात केली आहे. विस्तार झाल्यानंतर पक्षात अनेकांची नाराजी ओढवली जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवरही या डिनर डिप्लोमसीकडे पाहिले जात असल्याचं सांगितलं जात आहे.
संवाद ठेवण्याचा प्रयत्न
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. राज्यातील सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटाला मिळणारी मंत्रिपदं अजितदादाच्या गटाला गेली. परिणामी शिंदे गटातील मंत्रिपदाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी संख्येत किती लोकांना सामावून घ्यायचं असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे. विधानसभा निवडणुकीला वर्ष उरलं आहे. त्यापार्श्वभूमीवर विस्तार होणार आहे.
हा विस्तार शेवटचा असेल असं सांगितलं जात आहे. या शेवटच्या विस्ताराचा फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी चार तर अजितदादा गटाचे फक्त दोन सदस्य मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे कुणाकुणाला मंत्रिपद द्यावं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे. त्यामुळेच आमदारांशी सातत्याने संवाद ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असून डिनर डिप्लोमसी हा त्याचाच एक भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
चर्चांना उधाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांनी राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार आणि इतर निवडक राजकीय नेत्यांसाठी 10 ऑगस्ट रोजी स्नेहभोजन आयोजित केले आहे. 76 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य सांगितले आहे, यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र दिनानिमित्त आमदारांना डिनर ठेवलं नव्हतं, हे विशेष. यामागे काही राजकीय घडामोडी आहे का? असाही कयास वर्तवला जात आहे.