मुंबई | 4 जुलै 2023 : बारसूच्या रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे. काही लोकं ज्यांना या देशाचा विकास नकोय, ती माणसं आरेच्या आंदोलनात दिसतात. तीच माणसं बुलेट ट्रेनच्या आंदोलनात दिसतात. तीच माणसं आपल्याला बारसूच्या आंदोलनात दिसतात. यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनातही होते. यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरूला जात असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या अकाऊंटमध्ये बंगळुरूमधून पैसे आले आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला.
विधान परिषदेत बारसूच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला. ग्रीन पीसवर बंदी घातलेली आहे. या ग्रीन पीसच्या एक्स कॅडरच्या संपर्कात बारसूतील कथित आंदोलक आहेत, असा दावा करतानाच आपण उशीर केल्यामुळे सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती. तिने पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्याचा फायदा मिळत आहे. तरी आपल्या सरकारी कंपन्या ही रिफायनरी करणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा प्रश्नही विधान परिषदेत उपस्थित झाला. त्यावरही त्यांनी खुलासा करताना वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचा दावा केला आहे. पहिल्यांदा तुम्ही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला असं म्हटलं, पण ही वस्तुस्थिती नाहीये. या राज्यात कुणाचंही सरकार आलं तरी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करत नाही. ती वेळही येऊ नये. मागच्या वर्षी मंदिरात सर्वांना प्रवेश दिला होता. तिथे चेंगराचेंगरी झाली. काही महिलांच्या अंगावर महिला पडल्या होत्या, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या चेंगराचेंगरी नंतर यावर्षी नियोजन कसं करायचं याची एक बैठक झाली. त्या बैठकीत सांगण्यात आले की, 56 दिंड्यांना प्रत्येकी 75 पास द्यायचे. त्यांना पहिल्यांदा प्रवेश द्यायचा. त्यानंतर ते निघून गेल्यावर इतरांना प्रवेश द्यायचा. असं एकत्रितपणे निर्णय झाला. मंदिर परिसरात बॅरिकेड लावलेले होते. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील 300 ते 400 आजीमाजी विद्यार्थी गोळा झाले. आम्हालाही प्रवेश द्या असं ते म्हणत होते. त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. यांचं झालं की तुम्हाला प्रवेश देऊ, असं या विद्यार्थ्यांना सांगितलं गेलं.
पोलिसांनी समजावलं. प्रतिष्ठीत नागरिकांनीही त्यांना समजावलं. ज्ञानेश्वर महाराजांचे चोपदार, विश्वस्त सर्व तिथे आले. त्यांनी सांगितलं हा सर्वांनी निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही थांबा. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सर्व शक्तिनिशी बॅरिकेड तोडले. आणि पोलिसांच्या अंगावरून धावले. पोलीस जखमी झाले. तरीही पोलिसांनी त्यांना पुढे थांबवलं आणि बॅरिकेडपर्यंत आणलं, असंही त्यांनी सांगितलं.
ही मुलं बॅरिकेड तोडून पुढे गेली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर एडीट करून टाकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी स्वत: तिथे असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज रिलीज केले. कुणावरही लाठीचार्ज झाला नाही. उलट संस्थेतील माजी विद्यार्थी आणि जमललेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलं की, मारहाण झाली नाही. पोलिसांनी मारहाण केली नाही. मीडियालाही त्याने सांगितलं. पोलिसांना आणि एका वारकऱ्याला खरचटलं. पण गोंधळामुळे खरचटलं आहे. लाठीचार्जमुळे नाही, असा खुलासाही त्यांनी केला.