बीड | 27 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर अवघा महाराष्ट्र् आश्चर्यचकित झाला. अजित पवार हे विरोधी पक्षनेते पदावर असताना अचानकपणे ते भाजप-शिवसेनेच्या युतीत सामील झाले. अजित पवार यांच्या निर्णयामुळे शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. खुद्द शरद पवार यांनीही अनेकदा आपण भाजप सोबत जाणार नाही. माझी भूमिका भाजप विरोधीच आहे, असं स्पष्ट केलं. मात्र आता मंत्री छगन भुजबळ यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपसोबत जाताना नेमकं काय घडलं? यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादीच्या सत्ता सहभागाबाबत छगन भुजबळ यांचे मोठं विधान केलं आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांसोबत आणि आमच्यासोबत असलेल्या 54 आमदारांच्या सह्या आहेत. सत्तेत जाताना आपल्याला काय बोलले पाहिजे? कुठल्या गोष्टींची सोडवणूक करून घेतली पाहिजे, याबाबत शरद पवारांनी मार्गदर्शन केलं होतं, असं छगन भुजबळ म्हणाले.
भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी शरद पवार यांचं वय झालं आहे. त्यांनी आता शांत राहावं. मार्गदर्शन करावं म्हटलं. त्यावर आता छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अजितदादा हे शरद पवारांच्या मुलासारख्या आहेत. त्यामुळे मुलाने, पुतण्याने काही सांगितलं तर त्यात चुकीचं काय आहे? प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठांना सांगितलं जातं वय झालंय. आता काळजी घ्या. तब्येत सांभाळा त्यात चुकीचं काही नाही, असंही भुजबळ म्हणालेत.
आतापर्यंत लोक अवमान झाल्यावर कोर्टात जात होते. मात्र आता आम्ही सन्मानाने फोटो लावला तरी कोर्टात जात आहेत. त्यामुळे आम्ही इथून पुढे फोटो लावणार नाही. आमच्यावर ही भरपूर केसेस आहेत, त्यामुळे त्यात आणखी एक वाढ नको, असंही भुजबळ म्हणालेत.
बीडमध्ये होणारी आजची सभा ही नाही म्हटलं तरी शक्ती प्रदर्शन सुरु झाल्यासारखं वाटतं आहे. आज सभेच्या ठिकाणी 60 ते 70 हजार खुर्च्या ठेवल्या आहेत. मात्र त्या पुरतील असं वाटत नाही. या सभेद्वारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुठल्या बाजूला आहेत. हे बाकीच्यांनी ओळखावं. अजित पवार चुकले की बरोबर हे ठरवणारं कोर्ट जनता आहे. आम्ही जनतेच्या कोर्टात जात आहोत, असं भुजबळ म्हणालेत.