बाॅलिवूडचे दिवंगत अभिनेते देव आनंद यांनी एक मोठा काळ गाजवलाय. विशेष म्हणजे आपल्या करिअरमध्ये देव आनंद यांनी तब्बल 100 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
देव आनंद यांना लहानपणापासूनच एक अभिनेता होण्याची इच्छा होती. देव आनंद हे मुळ पंजाबचे तर त्यांचे वडील हे वकिल होते. वयाच्या 24 व्या वर्षी देव आनंद यांनी मुंबई गाठली.
मुंबईमधील सुरूवातीचे दिवस देव आनंद यांच्यासाठी अत्यंत संघर्षमय होते. मुंबईमध्ये फक्त 30 रूपये खिशात घेऊन देव आनंद आले. सुरूवातीच्या काळात तर थेट रेल्वे स्टेशनवर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.
हळूहळू त्यांनी एक काम बघितले, त्यानंतर मोठ्या संघर्षानंतर त्यांना साल 1946 मध्ये पहिला बाॅलिवूड चित्रपट मिळाला. हम एक है या चित्रपटात त्यांनी काम केले. विशेष म्हणजे मुख्य भूमिकेत ते चित्रपटात होते.
प्यारेलाल संतोषीने हा चित्रपट तयार केला. देव आनंद यांनी हम एक है या चित्रपटानंतर परत कधीच मागे वळून बघितले नाही. अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.