नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना मोदी आडनावबद्दलच्या मानहानी प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द होताच केरळमध्ये खाली झालेल्या वायनाड लोकसभेच्या जागेसाठी लागलीच पोट निवडणूकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात लोकसभेची या पोट निवडणूकीचा कार्यक्रम पुढच्या एप्रिल महिन्यातच जाहीर होऊ शकतो असे वृत्त आजतक या ऑनलाईन वृत्तवाहिनीने दिले आहे.
निवडणूक आयोगाने राहूल गांधी निवडून आलेल्या केरळच्या वायनाड लोकसभा क्षेत्राची पोट निवडणूक घेण्याची लगोलग तयारी सुरू केली आहे. सुरत कोर्टाने कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवित दोन वर्षांची सक्तमजूरी शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे.
दाद मागण्यासाठी एक महिन्याची मुदत
राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याची अधिसूचना लोकसभा अध्यक्षांनी जारी केली आहे. कोर्टाने शिक्षा सुनावणाताना या निकाला विरोधात वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. राहूल गांधी यांना सत्र न्यायालयात या निकालाविरोधा अपिल करावे लागणार आहे. तेथून जर निकाल अपेक्षित लागला नाही तर त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा रस्ता मोकळा आहे. त्यानंतरही जर दाद मिळाली नाही तर थेट सर्वौच्च न्यायालयात ते स्पेशल एसएलपी देखील दाखल करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वरच्या न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात
कॉंग्रेसचे नेते यांना सुरत कोर्टाने मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी त्यांची खासदारकी लोकसभेच्या सचिव कार्यालयाने लगोलग रद्द केली आहे. या निर्णय कोर्टाचा निर्णय येताच लोकसभा सचिवालयाने लोकप्रतिनिधी कायदा कलम 8 नूसार घेतला आहे. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. मात्र त्यांची सदस्तत्व वाचविण्याचे सर्व मार्ग अजून बंद झालेले नाहीत. ते आपल्यावरील अन्यायाची दाद हायकोर्टातही मागू शकतात. तेथे जर सुरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली तर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व वाचू शकते. हायकोर्टाने जर त्यांची बाजू मान्य केली नाही तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात. जर त्यांना सुप्रिम कोर्टाने दिलासा दिला तर त्यांची सदस्यत्व वाचू शकते. परंतू वरच्या न्यायालयात जर त्यांना दाद मिळाली नाही तर मात्र राहूल गांधी यांना आठ वर्षांकरीता कोणीतीही निवडणूक लढविताना येणार नसल्याचे म्हटले जात आहे.
कोलारमधील रॅलीत केलेले वक्तव्य नडले
राहूल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमधील रॅलीत 13 एप्रिल 2019 रोजी नीरव मोदी, ललीत मोदी असे सर्व घोटाळेबाजाचे नाव मोदीच कसे ? असा आशयाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने आपल्या समाजाची बदनामी झाल्याची याचिका भाजपा आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी कलम 499 , 500 अंतर्गत करीत गांधींवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. राहूल यांनी सर्व चोरांची नावे मोदीच का असतात असे वक्तव्य करीत आपल्या सभेत संपूर्ण मोदी आडनावाच्या समाजालाच बदनाम केल्याचा आरोप या याचिकेत पूर्णेश मोदी यांनी केला होता. पूर्णेश मोदी यांना भूपेंद्र पटेल यांच्या सरकारच्या पहिल्या मंत्री मंडळात स्थान मिळाले होते. डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणूकांत ते पुन्हा सूरतहून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत.