नवी दिल्ली : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या दिल्लीत (Delhi Murder Case) झालेल्या खळबळजनक हत्याकांड प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. श्रद्धाच्या हाडांचे विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल आला आहे. त्यात करवतीने तिची हाडे कापल्याचे स्पष्ट होत आहे. १८ मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केली. आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते. आता दिल्ली पोलीस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहे.
काय आहे अहवाल
श्रद्धा वालकरच्या २३ हाडांचे पोस्टमॉर्टन विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. डीएनए टेस्टमध्ये ही हाडे श्रद्धाची असल्याचा अहवाल आला होता. डीएनए अहवालासाठी श्रद्धाच्या वडिलांचे सॅम्पल वापरण्यात आले होते. ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्समध्ये त्याचे विश्लेषण केले गेले. या विश्लेषणात करवतीने हाडे कापल्याचे स्पष्ट झाले. करवतीचे निशानही त्यावर सापडले आहे. श्रद्धा हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आफताब पुनावाला याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आफताबची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मात्र आफताब वारंवार आपला जबाब बदलत होता.
काय होते वादाचे कारण?
श्रद्धाला आफताबसोबत दिल्लीला शिफ्ट व्हायचे होते. मात्र आफताब यासाठी तयार नव्हता. तसेच आफताब सतत कुणाशी तरी चॅटिंग करत असायचा. श्रद्धाने याबाबत विचारताच सारवासारव करायचा. यातूनच दोघांमध्ये भांडणं व्हायची, असे दिल्ली पोलीस सूत्रांनी सांगितले.दोघांमधील भांडण आणि दुरावा मिटावा यासाठी आफताबा श्रद्धाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड टूरवर घेऊन गेला होता.