घोटाळ्याच्या केसेस क्लिअर करण्यासाठीच पहाटेचा शपथविधी; प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अजित पवार यांची पोलखोल
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाची वाट लावू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
बदलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केलं आहे. केसेस काढून घेण्यासाठी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी उरकून घेतला. केसेस काढून घेण्यासाठी अजितदादांनी हे केलं असं मला वाटतं. आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर अजितदादा सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. हे बदलाचे संकेत आहेत का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बाजार समितीत महाविकास आघाडीचीच सत्ता होती. त्यामुळे नव्याने काही आलंय असं मला वाटत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबडेकर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीचं अचूक विश्लेषण करून आघाडीच्या विजयातील हवाच काढून घेतली आहे.
तोवर इतरांना मदत
आरएसएस, बीजेपी हे जोवर वर्चस्ववादी, लोकशाहीविरोधी आणि मनुवाद्यांची भूमिका मांडतेय, ती सोडत नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात जे आहेत त्यांना आम्ही मदत करणार, असं आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचंही ते म्हमाले. बारसू प्रकल्पाला आमचा विरोध आहे. एन्रॉनलाही विरोध होता. एन्रॉन घालवण्यामध्ये आमची भूमिका मोठी होती. एकनाथ शिंदेंना इतकंच सांगतो की कोकणाची वाट लावू नका, असं ते म्हणाले.
त्यांच्या भूमिका बदलतात
केंद्रातून फोन आले की यांच्या भूमिका बदलतात. कोकणात 95 टक्के ऑक्सिजन आहे. तिथे फ्लोरा आणि फोना जन्माला येतो. प्रदूषणमुक्त परिसर असल्यामुळे हे होतं. तो परिसर तसाच राहायला हवा. राहिला कोकणातल्या लोकांच्या जगण्याचा प्रश्न, तर अंतुले जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले की, मला पूर्णवेळ मिळाला तर मी कोकणाचा कॅलिफोर्निया करू शकतो. त्यांच्याच काळात गाव तिथे एसटी सुरू झालं. पण नंतर त्यांच्यावर गंडांतर आणून त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात आलं.
इंडस्ट्री येऊन कोकणात रोजंदारी वाढेल असं नाही, तर कोकणातील नैसर्गिक संपत्तीचं प्लॅनिंग करून व्यापार, छोटे उद्योग सुरू केले, तर तेलंगणाप्रमाणे कोकणातही लोकांचं उत्पन्न वाढेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.