‘रात्री एक वाजता अमित शाह यांना फोन’, देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भर सभेत प्रतिक्रिया दिली. भाजपचं आज भिवंडीत एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी विदर्भात पोहरादेवीची शपथ घेऊन भाजपसोबत 2019 अध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा पुनरुच्चार केला. त्यानंतर आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेच्या गोटात पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या होत्या याची आज पुन्हा माहिती दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
“2019 साली भाजप-शिवसेनेच पूर्ण बहुमत आलं. पण काही लोक शपता देखील खोट्या घेताय. मला याचं दु:ख आहे मला. पोहरादेवीला जाऊन खोटी शपत घेतली. त्यांनी मनात देवीची माफी मागितली असेल की, राजकारणासाठी मला खोटं बोलवं लागलं”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘मी रात्री एक वाजता अमित शाहां फोन लावला’
“मी रात्री एक वाजता अमित शाह यांना फोन लावला. आता काही काळाकरता मुख्यमंत्रीपद पाहिजे, असं ते म्हणत आहेत. तेव्हा अमित शाह मला बोलले की, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की, मुख्यमंत्री भाजपचा असेल. आम्ही तुम्हाला मंत्रीपदे देऊ. मी हे सर्व उद्धव ठाकरे यांना सांगितलं. मग उद्धव ठाकरे म्हणाले, हे जर होणार नसेल तर युती करणं कठीण आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“तीन दिवसांनंतर एक मध्यस्थ आले आणि म्हणाले की, उद्धवजी ठाकरेंना बोलायचं आहे. पालघरची जागा त्यांना हवी होती. आमचे नेते आम्हाला म्हणाले की, एका जागेसाठी युती तोडणं योग्य नाही. ती जागा त्यांना द्या. मग ती जागा दिली. अमित शाह, उद्धव ठाकरे, मलाही बोलवलं. त्यांनी मला सांगितलं होतं की, मला काही मनातलं बोलायचं आहे”, असं फडणवीसांनी सांगितलं.
“पत्रकार परिषद झाली. मी सर्व सांगितलं. मी अतिशय तोलामोलाच्या शब्दात पीसीमध्ये बोललो. त्यानंतर प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील असं होतं. पण निवडणूक झाल्यानंतर डिटेल्स आले. त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे. आमचे सर्व दरवाजे ओपन आहेत. त्यानंतर काय झालं हे सर्वाना माहीत आहे”, असं फडणवीस म्हणाले.
‘शाह-ठाकरे यांची बंद खोलीत चर्चा, नंतर’
“अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची त्यावेळी बंद खोलीत चर्चा झाली. मग तेव्हा सर्व ठीक आहे, असं सांगण्यात आलं. तेव्हा पत्रकार परिषद करण्याचं ठरवलं. मीच पत्रकार परिषदेत बोलायचं असं ठरवलं. मग मी दोन वेळा काय बोलणार? हे सांगितलं. पुढे वाहिनी आल्या. त्यांच्यासमोर सुद्धा पुन्हा काय बोलणार? हे सांगितलं”, असं फडणवीस म्हणाले.
“उद्धव ठाकरे यांनी जे केलं ती बेईमानी होती. त्यांनी पाठीत खंजीरच खुपसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून वोट मागता आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाता. हा खंजीर मोदीजींच्या, उत्तम राव ते गोपिनाथ मुंडे यांच्या पाठीत खुपसला”, अशी टीका फडणवीसांनी केली.
“भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचा उमेदवार निवडून यावा यासाठी मेहनत घेतली. त्यांनी त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसला. आम्हाला कोणी म्हणतं, पक्ष फोडला, घर फोडलं. पण सुरुवात कोणी केली?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
‘जेव्हा अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील’
“अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत. ते विचार करून आले आहेत. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येतील. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भावनिक मैत्री आहे आणि अजित पवार यांच्या सोबत राजकीय मैत्री आहे. भविष्यात तेही भावनिक मित्र होतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“जगाच्या पाठीवर आज मोदीजींनी नाव गेलं आहे. गरीबी कमी केली. आज सगळे लोक मोदींजींच्या विरोधात एकत्र येत आहेत. तेव्हा सर्वांना एकत्र घेणे गरजेचं आहे. जे येतील त्यांना घेऊ. पण काँग्रसचे विचार चालणार नाहीत. ते विचार तुष्टीकरणाचे आहेत. एमआयएमला कधी सोबत घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.