डोंबिवली / 24 ऑगस्ट 2023 : स्टेशन परिसरात रिकाम टेकडे बसलेल्यांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डोंबिवलीत स्टेशन मास्तर, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. कॉलेज चुकवून रेल्वेच्या फलाटावर फ्लर्ट करणारे, तिकीट काढून फलाटावर तासनतास टाईमपास करणाऱ्या प्रेमी युगुलावर डोंबिवली रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि स्टेशन मास्तर कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकत्रितपणे 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वे फलाटावर गर्दी करत तासनतास बसणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी कॉलेज बुडवून रेल्वे स्टेशनवर टाईमपास करताना दिसतात. अनेक प्रेमी कोपरे पकडून चाळे करताना दिसतात, तर अनेक जण तिकीट काढून केवळ रेल्वे फलाटावर फिरत राहतात. याचाच फायदा लोकल पकडण्याच्या किंवा उतरण्याच्या गडबडीत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल आणि पर्स चोरणारे चोरटे घेतात. यामुळेच फलाटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही थांबू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात डोंबिवली रेल्वे पोलिसांबरोबरच आरपीएफ आणि स्टेशन मास्तर कार्यालयाकडून पाचही फलाटावर संयुक्तिक कारवाई करण्यात आली. रिकाम टेकड्यांना दणका देत जवळपास दोन तासात 25 ते 30 जणांवर कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं. डोंबिवली स्टेशन परिसरात कामाशिवाय फिरू नये असे आव्हान करत रिकाम टेकड्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.