मोठी बातमी! जिथे शरद पवार यांनी माघार घेतली तो बालेकिल्ला जिंकायचाय, राष्ट्रवादीची रणनीती ठरली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातून निसटलेला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला. माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात लढत झाली होती. पण मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील 25 हजार 344 मतांनी विजयी झाले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या चिरंजीवांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शरद पवार स्वत: रणांगणात उतरले होते. पण नंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: माढ्यात आले होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत आपण ओबीसी असल्याचं विधान केलं होतं. अखेर या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला माढा बालेकिल्ला भाजपच्या हाती गेला. पण आता राष्ट्रवादीने तो बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अनोखी रणनीती आखली आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील यांचे स्पष्ट संकेत
लोकसभेची निवडणूक अवघ्या एक वर्षावर येवून ठेपली आहे. अशा परिस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवायचा असेल तर राष्ट्रवादीकडून अतिशय ताकदवान नेत्याला उमेदवारी द्यावी लागेल, ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने हेरली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने माढासाठी आपला उमेदवारही निश्चित केल्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अजित पवार स्वत: तसे म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मी राजकारणात 1991 ला आलो. त्याचवेळी रामराजे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत झाले. हे कुटुंब समाजकारण, राजकारणात.. अनेक महत्त्वाच्या निर्णयांत नाईक-निंबाळकर कुटुंबाचं योगदान आहे. मी बारामतीत हायस्कूलला होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आमदार झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. १९९५-९९-२००४ सलग तीनवेळा रामराजेंना विधानसभेत संधी मिळाली”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“१९६७ ला शरद पवार विधानसभेत गेले त्यानंतर बारामतीचा कायापालट झाला. नेतृत्व पुढे आल्याशिवाय बदल होत नाही. जुन्या काळात अनेक नेते फलटण परिसरात काम करायचे. रामराजे इथे आल्यानंतर त्यांनी अनेक विषय मार्गी लावले. बाजार समितीत तुम्ही १८ जागा निवडून आणून रामराजेंना वाढदिवसाची भेट दिली. जनता मजबुतीने पाठिशी उभी राहते तेव्हा काम करण्याचा प्रोत्साहन मिळतं”, असा दावा अजित पवार यांनी केला.
“१९९९ साली ४५ अपक्ष आमदार. त्यावेळच्या आमदारांना ५० खोके एकदम ओके असं म्हटलं गेलं नाही. रामराजेंनी कृष्णा खोऱ्याचं काम मार्गी लावण्याचा आग्रह धरला. २००४ साल, जनावरांच्या छावण्या, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष, त्यावेळी पावसासाठी बारामतीत कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवला. त्यावेळी अनुशेष भरुन काढण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण निधी देता येत नव्हतं. आम्ही त्यावेळी राज्यपालांसह हेलिकॉप्टरने दौरा केला”, असं पवारांनी सांगितलं.
“आधी पुरंदरला जायचं ठरलं. त्यावेळी आम्ही कोरड्या पडलेल्या नाझरे धरणात हेलिकॉप्टर उतरवलं. त्यांना वस्तुस्थिती दाखवली. त्यामुळे त्यांनी १४०० कोटी रुपये मंजूर केले आणि त्यातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. उगाचच रडत बसायचं नाही. धमक असेल तर कोणतंही काम होतं. त्यांनी वेगवेगळी पदे ताकदीने भुषवली”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांचे महत्त्वाचे संकेत
“फलटणमध्ये सगळ्या जागा यायच्या. त्यामुळे जिल्हा परिषद ताब्यात ठेवता आली. जिल्हा बँकही पूर्वी उंडाळकरांच्या ताब्यात होती. मात्र आम्ही ती आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आणली. रामराजे स्वत: सभापती आणि जावई विधानसभेत अध्यक्ष. असं कुठं घडलं नसेल. रामराजेंनी विधानसभा पाहिली. विधानपरिषद पाहिली. आता लोकसभा पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रदेशाध्यक्षांनी जी सुचना केली. त्याला माझं अनुमोदन. आम्हीही बाब मांडल्यावर पवारसाहेबही त्याला मान्यता देतील. त्यामुळे आता रामराजेंना लोकसभेत पाठवायची तयारी करावी लागेल”, असे संकेत अजित पवारांनी दिले.
“काही ठिकाणी विधानसभा, विधानपरिषदेत खुर्चा उचलून मारतात. जयललितांनी आपल्या अपमानाचा बदला घेत इतिहास घडवला. अपमानानंतर मुख्यमंत्रीपद मिळवलं. धोम बळकवडीच्या कामात रामराजेंचं योगदान नाकारता येणार नाही. आताचे राज्यकर्ते नको त्या गोष्टीवर बडबड करतात. काहीजण राष्ट्रीय नेत्यावर बोलतायत. शेतकऱ्यांचे प्रश्न, गारपीठ होतेय, शेतकरी अडचणीत, त्याला बाहेर काढण्यासाठी धमक आणि ताकद असणारी माणसंच सरकारमध्ये असावीत. यापुढील काळातही कोणत्याही बाबतीत आम्ही कमी पडणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.