पंढरपूर | 29 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि ते थेट सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व मंत्र्यांसाठी आता खातेवाटपही जाहीर झालंय. राष्ट्रवादीच्या या गटाला चांगली मलाईदार खाती मिळाली आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट विरोधी पक्षात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात आहे. तसेच शिवसेना पक्षात वर्षभरापूर्वी मोठी फूट पडली. त्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्याचं सर्वोच्च पद मिळालं. पण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना ही विरोधी पक्षात आहे. सध्या तरी काँग्रेस पक्ष एकसंघ दिसत आहे. पण भाजपकडून काँग्रेसबद्दलही मोठा दावा करण्यात आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त होऊन आता वर्ष उलटलं आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या तीन मोठ्या पक्षांपैकी दोन मोठ्या पक्षांमध्ये मोठी विभागणी झालीय. फक्त काँग्रेस हाच पक्ष फुटलेला नाही. पण काँग्रेस पक्षही फुटीच्या पायरीवर असल्याची चर्चा सातत्याने रंगत असते. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडून तसं काही नाही. काँग्रेस एकसंघ असल्याचा दावा केला जातो. पण तरीही काँग्रेस पक्षाच्या फुटीबाबत नेहमी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात.
यावेळी माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसबद्दल मोठा दावा केला आहे. “काँग्रेस पक्ष लवकरच महविकास आघाडीमधून बाहेर पडणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षच महाविकास आघाडी फुटायला जबाबदार ठरणार आहे. काँग्रेसमधील काही आमदार सत्तेत येण्याची शक्यता आहे”, असा मोठा दावा रणजिससिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
“महाविकास आघाडीमध्ये राहून काही उपयोग नाही अशी काँग्रेस आमदारांची भावना आहे. त्यामुळे ते सत्तेत सामील होतील आणि तिकडे फक्त शेष राष्ट्रवादी आणि ठाकरे गट उरेल”, असं मोठं वक्तव्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं आहे.